ठळक बातम्या

पालघर, बोईसर आणि डहाणू गुटखा माफियांचे माहेरघर? बंदी असूनही खुलेआम विक्री

पालघर, बोईसर आणि डहाणू गुटखा माफियांचे माहेरघर? बंदी असूनही खुलेआम विक्री

पालघर :
महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि इतर नशिले पदार्थांवर बंदी असतानाही पालघर, बोईसर आणि डहाणू परिसरात गुटखा व पानमसाला खुलेआम विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक दुकानांवर हे पदार्थ सहज उपलब्ध असून, युवक आणि लहान मुले देखील या व्यसनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, पालघर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी गुटखा विरोधात जनजागृती मोर्चा काढून नागरिकांना सावध केले होते. “गुटखा खाल्ल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात” असा स्पष्ट इशारा डॉक्टरांनी दिला होता. मात्र डॉक्टरांनी केलेल्या या जनजागृतीनंतरही परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसत नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, गुटखा आणि नशेचे साहित्य मोठ्या प्रमाणावर ‘ब्लॅक’मध्ये विकले जात आहे. महाराष्ट्रात बंदी असतानाही ही विक्री इतक्या बिनधास्तपणे कशी सुरू आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गुटखा सेवनामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने हा धंदा वाढत असल्याचे दिसून येते. “कागदावर बंदी आणि प्रत्यक्षात मोकळा व्यापार” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
📹 या संदर्भातील व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून, त्यामध्ये दुकानांवर गुटखा खुलेआम विक्री होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता नागरिकांकडून प्रशासनाला थेट प्रश्न विचारला जात आहे —

👉 गुटखा बंदी फक्त कागदावरच आहे का?
👉 पालघर, बोईसर आणि डहाणू परिसरातील गुटखा विक्रीवर कठोर कारवाई कधी होणार?
नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की, गुटखा माफियांवर तात्काळ कठोर कारवाई करून हा अवैध व्यापार कायमचा बंद करावा, अन्यथा येणाऱ्या काळात युवकांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात येईल.
✍️
— पालघर नागरिक | विशेष प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *