पोलिस असल्याचे सांगत फसवणूक करणारा आरोपी अटकेत; सोन्याचे दागिने जप्त करण्यात मनोर पोलिसांना यश.
पालघर (मनोर) |
पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून फसवणुकीतून मिळवलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना विश्वासात घेत असे आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पसार होत असे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पीडितांनी दिलेल्या तक्रारीनंतर मनोर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
तपासादरम्यान तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतीस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, मनोर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुढील तपास मनोर पोलीस ठाणे करीत आहे.



