सफाळे पश्चिमेतील साईनगर आणि पाटीलवाडा जलमय; कुटुंबे घरांच्या छतावर अडकली, प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची प्रतीक्षा
पालघर | दि. ७ जुलै २०२६
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला असून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. अद्याप अनेक ठिकाणी प्रशासनाची मदत पोहोचलेली नसल्याने स्थानिक नागरिकच स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरखंड आणि बांबूच्या सहाय्याने एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.पूरग्रस्त कुटुंबांकडे अन्न, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अनेक तासांपासून छतावर अडकून मदतीची वाट पाहत आहेत.
पालघर नागरिकच्या वतीने जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व यंत्रणांना तातडीचे आवाहन करण्यात येत आहे की, सफाळे पश्चिम येथील साईनगर व पाटीलवाडा परिसरात त्वरित बचाव पथके पाठवून अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे तसेच अन्न, पिण्याचे पाणी, औषधे व इतर आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असून विलंब जीवावर बेतू शकतो.
📰 पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज



