ब्रेकिंग न्यूज | केळवा धरण परिसरात प्रशासन सतर्क, 130 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू
पालघर | ६ जुलै २०२६



·
केळवा धरण परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरण परिसरात धूप रोखण्यासाठी गोण्या व दगडांच्या साहाय्याने मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पाण्याचा प्रवाह व विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. पाण्याची पातळी वाढल्यास अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्था तात्काळ राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रभावित आठ गावांपैकी चार गावे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या गावांतील सुमारे 130 कुटुंबांपैकी 65 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर पूर्ण झाले असून उर्वरित 65 कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे.नागरिकांच्या सुरक्षेसाठी NDRF ची टीम परिसरात तैनात करण्यात आली असून जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, पोलीस, महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज
जनतेच्या सेवेत – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या



