ठळक बातम्या

पालघर :: तक्रारीनंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी; अवैध पार्किंग, वाहतूक कोंडी आणि नियमभंगावर नागरिकांचा संताप

पालघर :: तक्रारीनंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी; अवैध पार्किंग, वाहतूक कोंडी आणि नियमभंगावर नागरिकांचा संताप

नगर परिषदेची परवानगी असल्याचा दावा; परवानगी असेल तर ती जाहीर करा, अन्यथा तातडीने कारवाई करा नागरिकांची मागणी

पालघर-मनोर रोडवरील कथित बेकायदेशीर टॅक्सी स्टँड, रस्त्यालगत उभ्या असलेल्या टॅक्सी आणि सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आज पालघर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी टॅक्सी चालक आणि त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींनी “आम्हाला पालघर नगर परिषदेकडून येथे वाहने उभी करण्याची परवानगी आहे” असा दावा केल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आता नागरिकांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे की, जर अशी परवानगी दिली असेल तर ती सार्वजनिक करण्यात यावी. आणि परवानगी नसल्यास बेकायदेशीर टॅक्सी स्टँड तात्काळ हटविण्यात यावा.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, याच ठिकाणाहून अनेक टॅक्सी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी (ओव्हरसीट) घेऊन प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहनांची बेकायदेशीर पार्किंग झाल्याने व्यापारी, नागरिक आणि इतर वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.नागरिकांनी पालघर RTO विभागाने सर्व टॅक्सींचे परमिट, फिटनेस, विमा, PUC आणि इतर कागदपत्रांची विशेष तपासणी करावी, तसेच वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंग, ओव्हरसीट प्रवासी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय पालघर नगर परिषद, RTO आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवून वैध पार्किंगची व्यवस्था करावी आणि बेकायदेशीर स्टँड व अतिक्रमण हटवावे, अशीही मागणी जोर धरत आहे.आता सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न एकच आहे — कायद्याचे पालन सर्वांसाठी समान आहे का? की काही जणांना नियमांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते? प्रशासनाने या प्रश्नांची पारदर्शकपणे उत्तरे देत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *