पालघर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा? पोलिसांच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त; नियमभंग करणाऱ्यांना मोकळे रान?
पालघर | २४ ऑगस्ट २०२६.
पालघर हे संपूर्ण जिल्ह्याचे मुख्यालय. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये याच शहरात आहेत. मात्र, जिल्ह्याच्या मुख्यालयातीलच वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली असून, या परिस्थितीला वाहतूक पोलिसांची कथित निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? असा संतप्त सवाल आता पालघरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक ठिकाणी नो-पार्किंग झोनमध्ये सर्रास वाहने उभी केली जात आहेत.रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर पार्किंग सुरू आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? काही ठिकाणी रस्त्यावरच व्यावसायिक वाहने उभी करून मालाची विक्री होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. कचेरी रोड परिसरात पाण्याच्या बाटल्या विकणारे वाहन रस्त्यावर उभे करून त्याच ठिकाणी बाटल्यांची विक्री होत असल्याचे दिसून येते. या वाहनांना रस्त्यावर उभे राहण्याची परवानगी कोणी दिली? वाहतूक पोलिसांची परवानगी आहे का? याची चौकशी होणार का?याहून गंभीर बाब म्हणजे, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या काही वाहनांकडून वाहतूक पोलिसांना ‘मासिक हप्ता’ दिला जातो, अशी चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे सांगितले जाते. या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, अशी चर्चा होण्याची वेळच का आली? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची स्वतंत्र चौकशी करणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
पोलिसांसमोरच मोबाईलवर बोलणारे वाहनचालक; कारवाई कुठे?
पालघर शहरात दुचाकी आणि चारचाकी चालवताना मोबाईलवर बोलणारे वाहनचालक मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक वेळा वाहतूक पोलिसांच्या समोरच नियमभंग होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पोलिसांच्या डोळ्यासमोर नियम मोडले जात असतील तर कारवाई नेमकी कोणासाठी?
कमी वयाची मुले-मुली दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जण बसून प्रवास करताना दिसतात. काही रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.शहरात जिथे मर्यादित प्रवासी क्षमतेची परवानगी आहे, तिथे त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मग ओव्हरसीट रिक्षा आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई का होत नाही?
रस्त्यावर मोकाट जनावरे; प्रशासनाची जबाबदारी कोणाची?
पालघर शहरातील विविध रस्त्यांवर गायी, म्हशी आणि इतर जनावरे मोकाट फिरताना किंवा रस्त्यावर बसलेली दिसतात. यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात आणि अपघाताचा धोका निर्माण होतो. मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का?
हुतात्मा चौकात कायम वाहतूक कोंडी; एकच पोलीस कर्मचारी पुरेसा आहे का?
पालघरचा हुतात्मा चौक हा महत्त्वाचा वाहतूक बिंदू असून येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. मात्र, या ठिकाणी अनेकदा एकाच पोलीस कर्मचाऱ्यावर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असल्याचे दिसते. इतक्या महत्त्वाच्या चौकात अधिक मनुष्यबळ देण्याची गरज वरिष्ठ अधिकाऱ्यांना का जाणवत नाही?
पालघर रेल्वे स्थानक परिसरातही बस, रिक्षा आणि इतर वाहनांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. येथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले कर्मचारी प्रत्यक्षात काय काम करतात, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी होते का?
शिवाजी महाराज चौकात ४-५ पोलीस कर्मचारी; तरी नियमभंग सुरूच?
चार रस्ता, शिवाजी महाराज चौक हा पालघर शहरातून बोईसर, मनोर, -माहीम, सातपाटी आदी दिशांना जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या ठिकाणी चार-पाच पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे दिसते. तरीही ओव्हरसीट वाहने, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणारी वाहने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने याच मार्गावरून सर्रास जात असतील, तर पोलीस नेमके कोणती कारवाई करत आहेत?
आठवड्यातून एक-दोन दिवस माईकची गाडी फिरवली की वाहतूक शिस्त लागते का?
कधी कधी वाहतूक पोलिसांची माईक असलेली गाडी शहरातून फिरते. “रस्त्यावर पार्किंग करू नका, वाहन बाजूला लावा, ओव्हरसीट वाहन चालवू नका, मोबाईलवर बोलू नका,” अशा सूचना दिल्या जातात.सूचना देणे योग्यच; पण फक्त माईकवरून सूचना देणे आणि प्रत्यक्ष नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई न करणे, याला वाहतूक नियंत्रण म्हणायचे का?आठवड्यातून एक-दोन दिवस पोलिसांची गाडी फिरवून नागरिकांना दाखवण्यापुरती कारवाई होत असेल तर त्याचा फायदा काय?
रस्त्यांची दुरवस्था; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती होणार का?
पालघर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. विविध नागरिक आणि संघटनांकडून याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पाहणी, फोटो आणि आश्वासने अनेकदा झाली; मात्र प्रत्यक्ष रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार?नव भारतीय शिव वाहतूक सेना यांच्या माध्यमातूनही याबाबत अनेक पत्रे देण्यात आल्याचे सांगण्यात येते. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, तोही रोखण्यात आल्याचे सांगितले जाते. रस्ते दुरुस्त होत नाहीत, खड्डे बुजत नाहीत आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता मिळत नाही; मग जबाबदारी नेमकी कोणाची?
गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पालघर शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक नाही का?
तक्रारी, पत्रव्यवहार आणि ११२ वर कळवूनही परिस्थिती ‘जैसे थे’?
वाहतूक व्यवस्थेबाबत आतापर्यंत अनेक पत्रे संबंधित विभागाला देण्यात आली असून, ११२ क्रमांकावरही तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तरीही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
पत्रे घेण्यासाठी कार्यालये आहेत, तक्रारी स्वीकारण्यासाठी यंत्रणा आहे, माईकवरून सूचना देण्यासाठी पोलीस आहेत; मग प्रत्यक्ष कारवाई कुठे आहे?पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. यतीश देशमुख साहेब यांनाही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, नागरिकांच्या तक्रारींवर उत्तर आणि प्रत्यक्ष उपाययोजना कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर शहरातीलच वाहतूक व्यवस्था जर अशी असेल, तर जिल्ह्यातील इतर शहरांची परिस्थिती काय असेल?पालघरकरांना केवळ आश्वासन नको आहे; समान नियम, सातत्यपूर्ण कारवाई आणि सुरक्षित रस्ते हवे आहेत.
वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या निष्काळजीपणाच्या आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन नो-पार्किंग, ओव्हरसीट, मोबाईलवर बोलणारे वाहनचालक, बेकायदेशीर पार्किंग, मोकाट जनावरे, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था या सर्व बाबींवर संयुक्त पाहणी करून ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी पालघरकरांची मागणी आहे.प्रश्न साधा आहे — नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाईही सर्वांवर समान कधी होणार?
जावेद लुलानिया
जिल्हाध्यक्ष, बीजेपी प्रणित नव भारतीय वाहतूक सेना, पालघर



