कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “समुद्र संदेश” WhatsApp Channelचे लोकार्पण…
प्रतिक मयेकर
बोईसर| मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले. ०७ मे ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा उद्देश प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व लोकाभिमुख करणे हा होता. या मोहिमेअंतर्गत ई-ऑफिस प्रणाली, आपले सरकार पोर्टल, डॅशबोर्ड, WhatsApp Chatbot, AI व Blockchain आधारित प्रणाली तसेच GIS तंत्रज्ञानाचा वापर या महत्त्वाच्या बाबींचे अंतरिम मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात कोंकण परिक्षेत्राने राज्यातील सर्व परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक कार्यालयांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.
याच सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते “समुद्र संदेश” या विशेष WhatsApp Channelचे लोकार्पण करण्यात आले. हे चॅनेल किनारपट्टीवरील नागरिकांच्या सागरी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, आपत्ती व्यवस्थापन, मासेमारी व्यवसाय सुरक्षा, तसेच अवैध शस्त्रसाठा, अंमली पदार्थ तस्करी, संशयास्पद बोटी यासंबंधी माहिती देण्यासाठी नागरिकांना थेट पोलिसांशी जोडणार आहे. या चॅनेलमुळे Two Way Communicationची सुविधा उपलब्ध होत असून नागरिक आणि पोलिस प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले की, “सागरी सुरक्षेसाठी ‘समुद्र संदेश’ हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. कोंकणातील प्रत्येक नागरिकाने QR कोड स्कॅन करून या WhatsApp Channelशी जोडावे व ‘सुरक्षित समुद्र – सुरक्षित किनारा’ या मोहिमेत सहभागी व्हावे.” कोंकण परिक्षेत्र पोलिसांनी केवळ या मोहिमेत प्रथम क्रमांक पटकावला नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून पोलीस कार्यप्रणालीत क्रांती घडवली आहे. AI व Blockchain प्रणालीद्वारे मुद्देमालाचे जतन व तपास प्रक्रियेत पारदर्शकता, GIS प्रणालीद्वारे गुन्हेगारी स्थळांचे व संवेदनशील ठिकाणांचे डिजिटल मॅपिंग, क्राईम मॅपिंगद्वारे वेळेनुसार व टक्केवारीनुसार गुन्ह्यांचा आढावा, वाहतूक व आपत्ती व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाधारित नियोजन, यामुळे कोंकण परिक्षेत्र पोलीस प्रशासन राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कोंकण परिक्षेत्राने ई-गव्हर्नन्स सुधारणांत घेतलेली झेप ही केवळ प्रशासनासाठीच नव्हे, तर नागरिकांसाठीही अभिमानाची बाब आहे



