गणेशोत्सवाची धामधूम – जनता दंग, पण पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर…

गणेशोत्सवाची धामधूम – जनता दंग, पण पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर…

प्रतिक मयेकर

बोईसर | गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात लाखो भाविक गणरायाचे स्वागत व विसर्जन करत असताना, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव मात्र २४ तास रस्त्यावर तैनात राहून आपले कर्तव्य बजावत असतात.

पालघर जिल्ह्यासह अडीच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू असताना, प्रत्येक चौकात, प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी, प्रत्येक मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस अधिकारी व कर्मचारी अविरत सेवा देताना दिसतात. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षेची दक्षता, वादविवाद आटोक्यात ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत ते स्वतःच्या सण-आनंदाला मुकतात.

सुट्टीशिवाय जबाबदारी

सामान्य नागरिक सणासुदीला घरच्यांसोबत आनंद घेत असतो, पण पोलीस बांधवांसाठी सण म्हणजे अधिक जबाबदारीचा दिवस. पावसाच्या सरींमध्ये भिजत, उन्हाच्या तडाख्यात उभं राहून, अनेक तास न थांबता ड्युटी बजावत ते सण सुरळीत पार पाडतात.

गैरजबाबदार वर्तनाचा निषेध

गर्दीत शिस्त राखण्यासाठी पोलीस नागरिकांना नियम पाळायला सांगतात. परंतु दुर्दैवाने, काही गैरजबाबदार नागरिक या कष्टाची दखल न घेता उलट पोलीस बांधवांशी वाद घालतात, शिवीगाळ करतात. अशा प्रकारामुळे संपूर्ण समाजाला लाज वाटावी अशीच परिस्थिती निर्माण होते.

त्यागाला मान द्या

गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता मानतो. पण प्रत्यक्षात जनतेच्या सुरक्षेसाठी रोजच्या जीवनातील अनेक विघ्नांवर मात करणारे आपले पोलीसच असतात. त्यामुळे त्यांच्या त्यागाला मान द्यावा, सहकार्य करावे, हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *