आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक!
मुलांसाठी उभारलेले उद्यान बनले दारुड्यांचे आणि लफंग्यांचे अड्डे
प्रतिक मयेकर
बोईसर| डहाणू नगरपरिषदेकडून आगर परिसरात लाखो रुपये खर्च करून उभारलेले बालोद्यान हे आज ‘बालांसाठी नव्हे, तर बेफिकीर प्रशासनासाठी उभारलेले स्मारक’ ठरत आहे. चिमुकल्यांच्या खेळण्याचा, नागरिकांच्या विरंगुळ्याचा हेतू धुळीस मिळाला असून, हे उद्यान मद्यपी, धूम्रपायी आणि लफंग्यांचे केंद्रबिंदू बनले आहे.
ज्याठिकाणी मुलांच्या हसण्याचे आवाज घुमायला हवे होते, तिथे आता बिअरच्या बाटल्यांचे ठणाण, सिगारेटच्या धुराचे वलय आणि अश्लील चाळ्यांचे प्रकार दिसत आहेत. उद्यानाच्या प्रत्येक कोपऱ्यात पडलेला प्लास्टिक कचरा, रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या थोटक्यांचा खच हे नगरपरिषदेच्या अपयशाचे जळजळीत उदाहरण आहे.
रात्री अपुऱ्या प्रकाशाचा फायदा घेऊन येथे मद्यपान, धूम्रपान, अगदी गांजाचे सेवन होत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. त्यातच प्रेमी युगुलांचे निर्लज्ज प्रकार पाहून नागरिकांचा संताप उफाळला आहे. पालकांचा थेट सवाल आहे – “हे उद्यान आहे की प्रशासनाने मान्यता दिलेला असामाजिक घटकांचा अड्डा?”
नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून
उद्यान उभारले, पण त्याच्या देखभालीकडे पूर्णतः पाठ फिरवली. ना सुरक्षारक्षक, ना सीसीटीव्ही, ना पुरेशी प्रकाशयोजना – मग उद्यान असुरक्षित होणार नाही तर काय? नगरपरिषद जणू याकडे जाणूनबुजून डोळेझाक करत आहे, अशीच भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
नागरिकांनी ठाम इशारा दिला आहे – “जर उद्यानामध्ये सुरक्षा व्यवस्था उभारून असामाजिक घटकांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलनाच्या मार्गावर जाऊ. आमच्या मुलांचे बालपण धोक्यात टाकू देणार नाही.”
आगर बालोद्यान ही केवळ मुलांच्या सुरक्षिततेची समस्या नाही, तर नगरपरिषदेच्या उदासीनतेचा कळस आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या सावलीत आणि निष्काळजीपणाच्या धुक्यात हे उद्यान कायमचे अडकून राहणार, हा जळजळीत प्रश्न नागरिकांनी नगरपरिषदेसमोर ठेवला आहे



