*कोलवडे ग्रामपंचायतीला ISO मानांकन – सरपंच कुंजल संखे यांच्या नेतृत्वाचा मानाचा तुरा…*
बोईसर
प्रतिक मयेकर
बोईसर| “गाव मोठं नसावं, पण विचार मोठा असावा” या ध्येयाने प्रेरित होऊन सातत्याने विकासकामे राबवणाऱ्या कोलवडे ग्रामपंचायतीने आता एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंच कुंजल संखे यांच्या नेतृत्वाखालील कोलवडे ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त झाले असून हा सन्मान गावाच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे.
ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प, डिजिटायझेशन व शासन योजना वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर दिला. ग्रामसभेतील लोकशाही निर्णयप्रक्रिया आणि ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग या यशामागे महत्त्वाचा घटक ठरला आहे. ISO मानांकन ही केवळ कागदोपत्री नोंद नसून कार्यक्षमतेची, जबाबदार नेतृत्वाची आणि सुशासनाची ठोस पावती आहे. त्यामुळे आता कोलवडे ग्रामपंचायतीचे नाव संपूर्ण जिल्ह्यात आदर्श म्हणून घेतले जात आहे. गावकऱ्यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, “हे यश केवळ ग्रामपंचायतीचे नाही तर प्रत्येक कोलवडेकराचे आहे. पुढेही अशीच विकासाची गती कायम राहावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोलवडेच्या या यशामुळे इतर ग्रामपंचायतींसमोर एक भक्कम आदर्श उभा राहिला असून, “गावाच्या विकासासाठी इच्छाशक्ती असेल तर कसलीही मर्यादा अडथळा ठरत नाही,” हे कोलवडेने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
सरपंच कुंजल संखे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की,“हा मानाचा तुरा कोलवड्याच्या प्रत्येक ग्रामस्थाच्या डोक्यावर शोभतोय. ISO मानांकन मिळाल्याने आपल्यावर आणखी जबाबदारी आली आहे. विकासाची वाटचाल केवळ रस्ते, इमारती किंवा सुविधा यापुरती मर्यादित नाही; ती शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि पर्यावरण यांच्याशीही निगडीत आहे. या सर्व क्षेत्रांत कोलवडे एक आदर्श म्हणून उभं राहील, यासाठी माझी आणि माझ्या कार्यसंघाची निष्ठा कायम राहील. गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास हीच खरी ताकद आहे आणि यापुढेही ‘प्रत्येक घर – विकासाचे केंद्र’ हे आमचे ब्रीद राहील.”



