मोबाईल हरवले, सरकार झोपले – पण पालघर पोलिसांनी चमत्कार घडवला..!

मोबाईल हरवले, सरकार झोपले – पण पालघर पोलिसांनी चमत्कार घडवला..!

 

प्रतिक मयेकर

बोईसर | पालघर जिल्ह्यातील पोलीस दलाने एक अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे केवळ नागरिकांचा आनंदच नाही तर संपूर्ण प्रशासनालाही आरसा दाखवला आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने निर्माण केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलच्या मदतीने पालघर पोलिसांनी तब्बल १०४ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढले. या मोबाईलची एकत्रित किंमत तब्बल २० लाख ४० हजार रुपये इतकी असून, नागरिकांच्या हाती त्यांचा हरवलेला मोबाईल परत देताना कार्यक्रमस्थळी भावनिक दृश्ये पाहायला मिळाली.

 

गेल्या काही महिन्यांपासून हरवलेले मोबाईल मिळण्याची नागरिकांची आशाच संपली होती. पोलिस ठाण्यात नोंद करूनही मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा ठेवणारे फार थोडे. मात्र पालघर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हे अवघड काम शक्य केले. दि. ११ सप्टेंबर रोजी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, संजय दराडे यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.दराडे यांनी या वेळी पालघर पोलिसांचे कौतुक करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “CEIR पोर्टलच्या योग्य वापरामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढली आहे. पालघर पोलिसांनी दाखवलेल्या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.” नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करताना “मोबाईल परत मिळेल अशी आशा नव्हती; पण पोलिसांनी चमत्कार केला” अशी भावना व्यक्त केली.

 

पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले की, “तांत्रिक तपास आणि मानवी गुप्तचर यंत्रणेचा मेळ घालून आम्ही हरवलेले मोबाईल शोधले. अनेक दिवसांपासून मोबाईल हरवले असल्याने आशा सोडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही समाधान मिळाले.” त्यांनी भविष्यातही नागरिकांच्या सेवेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस दल सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दिले.

 

मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून कार्यक्रमाला भावनिक वळण मिळाले. काही नागरिकांनी आपले मोबाईल परत मिळाल्यावर पोलिसांना अश्रुपूर्ण डोळ्यांनी धन्यवाद दिले. हे दृश्य पाहून अनेकांनी “पोलिसांवरचा विश्वास परत जागा झाला” असे सांगितले.

ही कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष परिश्रम घेणाऱ्या पथकात पोनि प्रदीप पाटील, पोउपनि रूपाली वर्तक, पोउपनि समीर भोसले, पोन भुषण वाघमारे, मपोना कविता पाटील, मपोअं मोनिका तिडके, पोअं रामदास दुर्गेष्ट, पोअं रूपेश पाटील, पोअं रोहित तोरस्कर, पोअं अक्षय शेट्ये, मपोअं स्नेहलता ढोरे, मपोअं स्नेहल शेलार, मपोअं ऋषीका बारी यांचा मोलाचा सहभाग होता.

आज मोबाईल परत मिळाल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला असला, तरी या कामगिरीतून एक मोठा संदेश मिळतो – तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पोलिसांची चिकाटी एकत्र आली तर नागरिकांचा विश्वास जिंकणे अजिबात कठीण नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *