पार्ट 4.
पालघर :
कायद्याचे रक्षक की धंदेवाईकांचे रखवालदार? हा प्रश्न आज पालघर जिल्ह्यातील नागरिक संतापाने विचारत आहेत. गुटखा व गांजावर सरकारने बंदी घातलेली असताना, इथे हा धंदा खुलेआम चालतो. दुकाने, हॉटेलं, धाबे, रिक्षा-टेम्पो पासून तर शाळेच्या गेटजवळसुद्धा हे विषारी पदार्थ सहज उपलब्ध होतात. आणि या सगळ्या बेकायदेशीर साम्राज्याला पोलिसांचा “आशीर्वाद” मिळतो, असा ठाम आरोप होत आहे.

डहाणूचा गुटखा व्यापारी आता पालघरचा मानकरी!
डहाणूमध्ये थोडाफार दबाव आणला गेला म्हणून गुटखा-गांजाचे व्यापारी थेट पालघरला स्थलांतरित झाले आहेत. कारण इथे “हप्त्याच्या राजकारणा”खाली सर्व धंदे गोड मानले जातात. डहाणूचा धंदा पालघरला शिफ्ट झाला आणि पोलिसांनी या व्यापाऱ्यांना लाल गालिचा अंथरल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

पोलिस ठाण्यांची भूमिका संशयास्पद
पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी या सर्व भागांत एकच खेळ सुरू आहे – “हप्ता भरला की धंदा सुरू, हप्ता थकवला की कारवाई”. काही ठिकाणी मोठ्या पकडी दाखवून पोलीस स्वतःचं नाव उंचावतात, पण दुसऱ्याच दिवशी तोच माल पुन्हा बाजारात येतो. म्हणजेच कारवाई खरी की बनावट? हा प्रश्न लोकांना छळतो आहे.

राजकीय छत्रछाया – धंद्याचा खरा आधार
या काळ्या बाजारामागे केवळ पोलीस नाहीत, तर काही निवडक राजकीय नेत्यांची छत्रछाया आहे, अशी जोरदार चर्चा आहे. “पोलिसांना कोण धंदा चालवतो, कुठे माल उतरतो, कुठे वितरित होतो – सगळं माहित असतं. पण ते गप्प बसतात, कारण मागे राजकीय डोंगर आहे”, असे थेट आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांचा संताप – सरकारला थेट इशारा
आता जनतेचा संताप उफाळून येतो आहे.
“कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांच्या खिशात बसले, तर आम्ही सामान्यांनी कोणाकडे पाहायचं? सरकारने धाडस दाखवून गुटखा-गांजाच्या या साम्राज्याला आणि त्यांच्या पोलिस-राजकीय आडोशाला उघडे पाडले नाही, तर पालघर जिल्हा व्यसनाधीनतेच्या दलदलीत कायमचा बुडणार!”




