“जनतेचे सेवक की गाड्यांचे महाराज?” – बोईसरच्या बसकडे परिवहन मंत्र्यांचे डोळे झाक

“जनतेचे सेवक की गाड्यांचे महाराज?” – बोईसरच्या बसकडे परिवहन मंत्र्यांचे डोळे झाक!

 

प्रतिक मयेकर

 

बोईसर| पालघर जिल्ह्यातील बोईसर डेपोच्या एस.टी. बसमध्ये चढलात की प्रवास सुरू होण्याआधीच प्रवाशांना स्वतःच्या नशिबाची प्रार्थना करावी लागते. या बसकडे पाहिलं की हे प्रवासी प्रवासाला निघालेत की एखाद्या कबाडखान्यात बसून आहेत असा प्रश्न निर्माण होतो. पत्रे गंजून बाहेर आलेली, पावसाळ्यात छपरातून ओघळणारं पाणी, तुटक्या-फुटक्या सीटवर बसून अंगाला लागणारी लोखंडी सळई, आणि मध्येच बंद पडणारे इंजिन – हा रोजचा अनुभव आता प्रवाशांसाठी ‘सामान्य’ झाला आहे.

 

दररोज तिकीट काढून प्रवास करणारा हा सामान्य माणूस सुरक्षित, आरामदायी व वेळेवर प्रवास करावा अशी अपेक्षा बाळगतो. मात्र प्रत्यक्षात मिळते ती केवळ यातना. तिकीटाचे पैसे देणारा प्रवासी पावसाळ्यात गळक्या बसमध्ये पायापासून डोक्यापर्यंत भिजतो. काही बस तर एवढ्या जीर्णावस्थेत आहेत की जणू प्रवाशांसाठी मोफत ‘हाडतोड व्यायामशाळा’च उभी केली आहे. सीटवर बसलं की अंगाला सळई टोचते, उभं राहिलं की खिडकीतून थेट पावसाचं पाणी अंगावर ओघळतं. एवढ्या हालअपेष्टा सहन करूनही प्रवासी नाईलाजाने प्रवास करतो कारण दुसरा पर्याय नाही.

मात्र या सगळ्या समस्येकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसतं. मंत्रीमहोदयांच्या गाड्या मात्र आलिशान एसी, आरामदायी आणि चकचकीत! त्यातल्या सीटवर धुळीचा कणही बसू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. पण जनतेने मत देऊन मंत्री बनवलेला माणूस, त्या जनतेलाच गळक्या बसमध्ये ढकलतोय. हा कोणता न्याय? सेवक होण्याऐवजी सरनाईक साहेबांनी स्वतःला मालक समजायला सुरुवात केली आहे.

सामान्य नागरिकाच्या श्रमाच्या पैशाची एवढी थट्टा होऊ शकते का? तिकीटाचे पैसे घेणं मात्र वेळेवर, पण सेवा मात्र निकृष्ट! प्रवासी हा दानधर्म करत नाही, त्याचा हक्क सांगतो आहे. आणि हा हक्क हिरावून घेणाऱ्या सरकारला लोकशाहीच्या चौकटीत ठेवून प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

 

प्रवाशांचा आवाज आता दाबता येणार नाही. “तिकीट काढतोय, सेवा कुठे?” असा थेट सवाल मंत्रीमहोदयांना केला जातो आहे. बोईसरच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात अशा शेकडो बस प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. आणि तरीही मंत्रीमहोदय शांत! सत्ता मिळाल्यावर जनता विसरणाऱ्या अशा नेत्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल – जनता कधीच विसरत नाही. मतपेटीतून मिळालेल्या तिकिटावर बसलेले मंत्री, याच मतपेटीतून काढून टाकले जातात.

 

म्हणूनच सरनाईक साहेब, अजून वेळ गेलेली नाही. जनतेला फसवणं थांबवा. जीर्ण बस बदलून सुरक्षित व आरामदायी बस रस्त्यावर आणा. अन्यथा रस्त्यावर उतरलेली जनता आणि मतदान पेटीतला निकाल हे दोन्ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरतील. कारण जनता ही सेवकाची मालक असते, आणि मालकाच्या सहनशीलतेला मर्यादा असतात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *