गुन्हेगारांवर चपराक, पोलिसांची मोठी कामगिरी – २२ लाखांचा टेम्पो परत मिळाला
तलासरी :
गुन्हेगारीचे सावट आणि वाढते ट्रक चोरीचे प्रकार यामुळे वाहनधारकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतानाच, तलासरी पोलिसांनी नेमक्या वेळी दिलेला झटका म्हणजे गुन्हेगारांवर झालेली थेट चपराकच ठरली आहे. ७ सप्टेंबरला घडलेल्या ट्रक चोरीच्या घटनेत पोलिसांनी केवळ आठ दिवसांत तब्बल २२ लाखांचा आयसर टेम्पो परत मिळवून दाखवला आणि एकाला गजाआड करत चोरट्यांचे धाबे दणाणले.
घटनेचा धक्कादायक भाग असा की, माल वाहतुकीसाठी निघालेल्या फिर्यादी रामआश्रम यादव यांना आरोपींनी रस्त्यात थांबवून कारमध्ये ओढले, गाडीची चावी हिसकावली आणि गुजरातकडे घेऊन गेले. पण फिर्यादीने अंधाराचा फायदा घेत सुटका करून मालकाला कळवले. तरीसुद्धा ट्रक गायब होता. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोणताही ठोस पुरावा किंवा आरोपींचे वर्णन नसताना देखील पोलिसांनी हार न मानता तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि चौकस तपास यातून स्वप्नील मधुकर दुमाडा (रा. उसगांव बंधारा, ता. गणेशपुरी, जि. ठाणे) या आरोपीला १५ सप्टेंबर रोजी अटक केली. चौकशीत त्याने साथीदारांसह ट्रक चोरीची कबुली दिली. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला २२ लाखांचा टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे.
या संपूर्ण मोहिमेत यतिश देशमुख (पोलिस अधीक्षक, पालघर), विनायक नरळे (अपरा.पोलि.अ), अंकिता कणसे (उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू) यांच्या मार्गदर्शनाखाली, अजय गोरड (पोलिस निरीक्षक, तलासरी), पोउपनिरीक्षक विकास दरगडे, बबन गावीत, हिरामण खोटरे तसेच पोलीस अंमलदार योगेश मुंढे यांनी भक्कम भूमिका बजावली.
गुन्हेगारांचे डाव अयशस्वी ठरवत, तब्बल २२ लाखांचा टेम्पो परत मिळवून देणे ही केवळ पोलिसांची कामगिरी नसून, गुन्हेगारीला मिळालेली मोठी चपराक आहे. उर्वरित आरोपींना पकडून गजाआड करणे हा पुढचा टप्पा असून, या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे



