पालघर जिल्ह्यात मोफत डेड बॉडी फ्रीझरची सुविधा
प्रतिक मयेकर
आजचा समाज वेगाने बदलत आहे. जीवनाच्या शर्यतीत माणसामाणसातील नाती सैल होत चालली आहेत. धर्म, जात, पंथ यांच्या नावाने माणसामाणसांत भिंती उभ्या राहत आहेत. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती केवळ माणुसकी हेच आपलं धर्म मानून नि:स्वार्थ सेवा करत असेल, तर ती गोष्ट निश्चितच कौतुकास्पद ठरते. पालघर जिल्ह्यातील समाजसेवक मुकर्रम खान यांनी हाच आदर्श घालून दिला आहे.
मृत्यू हा अपरिहार्य आहे. तो न पाहता येतो, न टाळता येतो. तो कोणा एका धर्माचा नसतो, तो प्रत्येक घरावर समान रीतीने येतो. मृत्यूच्या त्या दु:खद प्रसंगी कुटुंबाला सर्वात जास्त भेडसावणारी अडचण म्हणजे अंत्यविधीची तयारी होईपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याची. अशावेळी आवश्यक असणारा डेड बॉडी फ्रीझर भाड्याने आणायचा झाला, तर त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. सर्वसामान्य कुटुंबाला हे पेलवणं कठीण होतं.
हीच वेदना ओळखून मुकर्रम खान यांनी “मोफत डेड बॉडी फ्रीझर सेवा” सुरू केली आहे. यात कुणालाही धर्म, जात, पंथ किंवा आर्थिक स्थिती पाहिली जाणार नाही. गरजूंना ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. समाजातील सर्व घटकांसाठी समान हक्काने ही सेवा खुली करून खान यांनी खरी माणुसकी काय असते, याचं जिवंत उदाहरण घालून दिलं आहे.
“ना धर्म, ना जात, ना पात – माणूस हा माणूस म्हणूनच महत्त्वाचा” हा संदेश त्यांच्या या उपक्रमातून अधोरेखित होतो. दु:खाच्या क्षणी नि:स्वार्थपणे मदतीचा हात पुढे करणं ही कृती केवळ समाजसेवा नाही, तर माणुसकीची खरी साधना आहे. आजच्या काळात अनेक संस्था, संघटना समाजसेवा करतात; पण मृत्यूच्या अशा कठीण क्षणी, जेव्हा कुटुंब पूर्णपणे खचून गेलेलं असतं, त्या वेळी आर्थिक ओझं न टाकता मोफत सुविधा देणं हे खरंच धाडसाचं आणि अनुकरणीय पाऊल आहे. या उपक्रमामुळे असंख्य कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
मुकर्रम खान यांचा हा उपक्रम केवळ पालघरपुरता मर्यादित नाही; तर तो समाजात ऐक्य, सौहार्द आणि बंधुत्वाचा संदेश देणारा आहे. ते एका धर्माचे प्रतिनिधी असूनही सर्व धर्मांच्या लोकांसाठी सेवा खुली करत आहेत. आजच्या परिस्थितीत हीच खरी “मानवी सेवा हाच खरा धर्म” या विचारांची प्रचीती आहे. या सेवेसाठी कोणीही गरजूंनी थेट मोबाईल क्रमांक 9623046665 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजात धर्म, जात, पंथ यांच्या नावाने तटबंदी उभी राहते. पण मुकर्रम खान यांचा उपक्रम या तटबंद्या फोडून माणुसकीचा सेतू बांधतो. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेला केवळ पालघर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून दाद मिळायला हवी. अशा व्यक्तिमत्त्वांमुळेच समाज अजूनही जिवंत आहे, आशावादी आहे.



