“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!”
प्रतिक मयेकर, पालघर
बोईसर| पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या सक्त सूचना आता प्रत्यक्ष कारवाईत उतरू लागल्या आहेत. “जिल्ह्यात कुठेही अवैध धंदा चालू राहणार नाही” — हा देशमुख यांचा स्पष्ट इशारा ठरवून धरत स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत दमण बनावटीच्या दारूच्या वाहतुकीवर जबर धडक दिली आहे.
दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे मौजे जव्हार येथील जिव्हाळा हॉटेलसमोर सापळा रचला. रात्री सुमारास टेम्पो क्रमांक MH-01 EM 9626 येताच पथकाने तो अडवून तपास केला असता, चालक गोपाल हिरा सिंग (वय ३५, रा. राजसमंद, राजस्थान) हा आपल्या टेम्पोतून तब्बल ₹२,०१,००० किमतीची दमण बनावटीची अवैध दारू विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टेम्पोसह एकूण ₹७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस अटक करून जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २६१/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की पालघर पोलिसांकडून अवैधतेला आता कोणतीही मुभा दिली जाणार नाही. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करून जिल्ह्यातील दारू माफियांना थेट इशारा दिला आहे की — “कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही!”
या मोहिमेत सहा. पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोहवा भगवान आव्हाड, आणि पोअमं विशाल लोहार यांनी धाडसीपणे कामगिरी पार पाडली. त्यांच्या या अचूक नियोजनामुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, आणि इतर बेकायदेशीर धंदे मोडून काढण्याचा निश्चय केलेल्या यतिश देशमुख यांच्या कठोर भूमिकेमुळे आता या माफियांना झोप उडाली आहे. पोलिसांची ही कारवाई फक्त गुन्हा उघडकीस आणणारी नाही, तर कायद्याची ताकद आणि प्रशासनाची सजगता अधोरेखित करणारी आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या कारवाईचं स्वागत करत सांगितलं — “देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आता कायद्याचं राज्य पुन्हा प्रस्थापित होतंय.”



