“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं!

Oplus_16908288

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं!

प्रतिक मयेकर, पालघर


बोईसर| सरावली ग्रामपंचायतीची घंटागाडी आज रस्त्यावरून धावत होती… पण त्यात कचरा उचलला जात नव्हता — तर जबाबदारी उडत होती! भरलेला कचरा उघड्यावर ठेवून गाडी हवेत धावत होती, आणि त्या वाऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कुजक्या वस्तू, दुर्गंधी नागरिकांच्या चेहऱ्यावर उडत होत्या. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.

ही घंटागाडी म्हणजे “स्वच्छ भारत” योजनेचा उपहास बनली आहे. एकीकडे सरकार कोट्यवधी खर्च करून स्वच्छतेची जाहिरात करते, तर दुसरीकडे ग्रामपंचायतींच्या अशा बेफिकिरीमुळे संपूर्ण अभियानाचा अर्थच उडून जातोय.

विचार करा — ग्रामपंचायत प्रशासनाने फक्त ग्रीन कलरची मॅट (जाळी) टाकली असती, तर हा कचरा हवेत उडाला नसता, नागरिकांच्या अंगावर पडलाच नसता. पण नाही! इथं नियम नाहीत, नियोजन नाही, फक्त बेफिकिरी आहे. चालकाकडे विचारलं असता तोच ठामपणे म्हणाला, “सर्वच ग्रामपंचायतीच्या गाड्या अशाच धावतात.” म्हणजे सर्वच ग्रामपंचायती “वाऱ्यावर” चालवल्या जात आहेत का?

हा प्रश्न केवळ सरावलीपुरता मर्यादित नाही. बोईसर, खैरेपाडा या परिसरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये हाच प्रकार सुरु आहे. ग्रामपंचायत निधीचा गैरवापर, वाहनांची देखभाल शून्य, आणि स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दाखवाच! वाहनात उडणारा कचरा हा फक्त दृश्य नाही — तो आपल्या सार्वजनिक आरोग्यावरील थेट हल्ला आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना या कचऱ्यामुळे केवळ दुर्गंधच नाही, तर संसर्गजन्य आजारांचंही संकट निर्माण होतंय. त्या गाडीच्या मागून जाणं म्हणजे शिक्षा भोगण्यासारखं झालं आहे. गाड्या तपासणारे अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतीच्या स्वच्छता समित्या कुठे आहेत? प्रशासनाला हे विचारावंसं वाटतं — तुमचं काम फक्त घंटा वाजवणं आहे का, की खरंच गाव स्वच्छ ठेवणं आहे? स्वच्छतेच्या नावाखाली एवढा मोठा ढोंग कशासाठी?

आता वेळ आली आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वच्छ भारत अभियान विभागाने या बेफिकिरीवर कठोर कारवाई करावी. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ सर्व घंटागाड्यांवर ग्रीन मॅट बसवाव्यात, चालक व कर्मचाऱ्यांना स्वच्छता नियमांचं प्रशिक्षण द्यावं, आणि दररोजच्या स्वच्छता कामावर देखरेख ठेवावी.नाहीतर हा कचरा फक्त रस्त्यावरच नव्हे — तर प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरही जमा होईल. सरावलीत घंटा वाजतेय, पण जबाबदारी नाही — आणि तो आवाज आता नागरिकांच्या कानाला नव्हे, तर विवेकाला टोचतो आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *