केळवे समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीचा भीषण अपघात 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.

दिनांक : 27 जानेवारी 2026.

केळवे समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीचा भीषण अपघात 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पालघर :

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केळवे समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या 12 वर्षांच्या जान्हवी महेंद्र पाटील हिच्यावर भरधाव घोडागाडी (टांगा) गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात जान्हवीच्या पोटावरून टांग्याचे चाक गेल्याने फुफ्फुस, यकृत व मूत्रपिंडाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर मुंबई (अंधेरी) येथील कोकीलाबेन रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पालघर शहरातील टेंभोडे नाका, लक्ष्मीवाडी येथील स्वस्तिक इलाईट इमारतीत राहणारी जान्हवी पाटील ही तिच्या सोसायटीतील महिलांसोबत केळवे समुद्रकिनारी गेलेली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी असताना पर्यटकांना सफर करून आणणारा टांगा अचानक भरधाव वेगाने तिच्या दिशेने आला. बेसावध अवस्थेत असलेल्या जान्हवीला जोरदार धडक देत टांग्याचे चाक थेट तिच्या पोटावरून गेल्याने ती जागीच गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर तिला तत्काळ रिक्षाद्वारे पालघर येथे नेण्यात आले. सिटी स्कॅननंतर यकृतातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, फुफ्फुसात रक्त साचणे आणि मूत्रपिंडाला गंभीर इजा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला आधी मीरा रोड आणि नंतर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेनंतरही घोडागाडी चालक चेतन घरत तसेच संबंधित व्यावसायिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली नाही, असा गंभीर आरोप होत आहे. अपघाताच्या वेळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थित होते, मात्र ते बाहेरगावचे असल्याने कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे न आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत केळवे सागरी पोलीस स्टेशनने समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या घोडागाड्या, उंट सफर आणि बीच बाईक तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परवान्यांचे नूतनीकरण न करता आणि सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता हे प्रकार सुरू असल्याचेही उघड झाले आहे.

विशेष म्हणजे, १५–१६ वर्षांपूर्वीही असाच प्रकार केळवे समुद्रकिनाऱ्यावर घडला होता, ज्यामध्ये एका तरुणाला आयुष्यभर अपंगत्व आले होते. वारंवार अपघात होऊनही प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

👉 12 वर्षांची मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे…

👉 घोडागाडी, बीच बाईक, उंट सफर यावर नियंत्रण कोणाचे?

👉 निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार?

 

पालघर नागरिक या घटनेचा तीव्र निषेध करत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची आणि पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *