ब्रेकिंग न्यूज | पालघर नागरिक
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पालघर दौऱ्यात रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चहाडे नाका येथील जीवघेण्या खड्ड्यांबाबत नागरिकांच्या भावना मंत्रींपर्यंत पोहोचल्या – दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पालघर | दि. १ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पालघर जिल्ह्याचा अधिकृत दौरा करून मनोर–मासवण–पालघर मार्ग, पालघर–सरावली–बोईसर मार्ग तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठकही पार पडली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान, भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी मंत्री महोदयांच्या दौऱ्यापूर्वीच पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका येथील जीवघेण्या खड्ड्यांबाबत मंत्री महोदय, पालघरचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना ई-मेल व व्हॉट्सअॅपद्वारे निवेदन पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली होती. तसेच यापूर्वी पालघर पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बोईसर एमआयडीसी यांच्याकडेही वारंवार लेखी पाठपुरावा करण्यात आला होता.

संघटनेने यापूर्वी खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित विभागांनी रस्त्यांची दुरुस्ती सुरू केल्याचा दावा करत काही छायाचित्रे पाठविली. मात्र चहाडे नाका येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता परिस्थिती वेगळीच असल्याचे निदर्शनास आले. मोठे खड्डे कायम होते, तर काही ठिकाणी केवळ वरवर खडी टाकून दुरुस्ती झाल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज जावेद लुलानिया, वनिता बरड, अर्पिता तिवारी आणि जावेद मेमन यांनी चहाडे नाका येथे प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्याजवळ प्रतीकात्मक स्वरूपात वृक्ष ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनीही वारंवार अपघात होत असल्याचे आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
जावेद लुलानिया म्हणाले, “आमचा उद्देश आंदोलन करणे नसून जनतेच्या जीविताचे रक्षण करणे हा आहे. मंत्री महोदयांनी स्वतः रस्त्यांचा आढावा घेतला असून आता संबंधित अधिकाऱ्यांनी कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष आणि दर्जेदार काम करून दाखवावे. जनतेची दिशाभूल करून छायाचित्रे पाठविण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला की, “मंत्री महोदयांच्या दौऱ्यानंतरही पुढील १० ते १५ दिवसांत पालघर–मनोर रोड, विशेषतः चहाडे नाका येथील जीवघेण्या खड्ड्यांची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती झाली नाही, तर भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल. आवश्यक असल्यास पुन्हा प्रतीकात्मक वृक्षारोपण, जनआंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाविरोधात आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.””आमचे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा विभागाविरुद्ध नसून, जनतेच्या सुरक्षिततेसाठी आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने आता प्रत्यक्ष कामातून दिसली पाहिजेत. अन्यथा नागरिकांच्या न्यायासाठी आमचा लढा अधिक तीव्र होईल,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
– जावेद मजीद लुलानिया
जिल्हाध्यक्ष
भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हा



