पालघर मनोर रोड चहाडे नाका येथे रस्ता दुरुस्तीचा दावा फोल? खड्ड्यात प्रतीकात्मक वृक्ष ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले; पोलिसांकडून दमदाटी केल्याचा आरोप.
पालघर | दिनांक : ०१ ऑगस्ट २०२६.
पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका येथील धोकादायक खड्ड्यांच्या प्रश्नावर भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांच्या नेतृत्वाखाली आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी वनिता बरड, अर्पिता तिवारी आणि जावेद मेमन हे चार कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबावा आणि प्रशासनाने कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता दुरुस्ती करावी, या मागणीसाठी हे
आंदोलन करण्यात आले.

यापूर्वी संघटनेने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालघर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच बोईसर MIDC प्रशासनाला पत्रव्यवहार केला. त्यानंतर दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, सर्व खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, अशी खात्री दिली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा मान राखत संघटनेने मोठ्या आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.मात्र, ३१ जुलै रोजी सायंकाळी चहाडे नाका परिसरात प्रत्यक्ष दुरुस्ती झालेली नसल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी घटनास्थळी पाहणी करण्यात आली. तेथे मोठे खड्डे पूर्वीप्रमाणेच असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी फक्त बाजूला खडी टाकण्यात आली होती, परंतु मुख्य खड्डे तसेच होते. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका मोठ्या खड्ड्यात प्रतीकात्मक स्वरूपात एक रोप ठेवून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविण्यात आला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनीही रस्त्याच्या अवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. जोपर्यंत एखाद्याचा जीव जात नाही, तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही.” स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली ही भूमिका व्हिडिओमध्येही नोंदविण्यात आली असल्याचे संघटनेने सांगितले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, आंदोलन सुरू असताना घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचारी भोईर यांनी आम्हाला तात्काळ तेथून निघून जाण्यास सांगितले. “येथून काही व्हीआयपींचा दौरा जाणार आहे” असे कारण देत आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप संघटनेने केला आहे. त्यावेळी आम्ही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की, जर प्रशासनाने खड्डे बुजविले असते तर आम्हाला येथे येण्याची वेळच आली नसती. या संपूर्ण घटनेचे तसेच नंतर गेलेल्या व्हीआयपी ताफ्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी आरोप केला की, आम्ही केवळ चार जण शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने प्रतीकात्मक आंदोलन करण्यासाठी गेलो होतो. कोणताही रस्ता अडविण्यात आला नाही, वाहतूक रोखण्यात आली नाही किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात आला नाही. तरीदेखील आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकांच्या जीविताच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्यांवर दबाव आणण्याऐवजी, निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे.संघटनेने असा आरोपही केला आहे की, PWD विभाग, संबंधित रस्ता कंत्राटदार तसेच बोईसर MIDC प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेकडे गंभीर दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांनी खड्डे बुजविल्याचे आश्वासन दिले, काही छायाचित्रेही पाठविली; मात्र चहाडे नाका येथील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आढळून आली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच पालघरचे पोलीस अधीक्षक मा. सतीश देशमुख यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तनाची तसेच प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची सत्यता तपासावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. जर प्रशासनाने कायमस्वरूपी, दर्जेदार आणि सुरक्षित रस्ता तयार केला, तर संघटनेला कोणतेही आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.”आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आहे. लोकांच्या हितासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. प्रशासनाने तो आदराने स्वीकारावा. रस्त्यावरील खड्डे कायम राहिले, तर येत्या काही दिवसांत अधिक व्यापक आणि तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी दिला.रस्ता सुरक्षित असेल तरच नागरिकांचे जीवन सुरक्षित राहील. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाविरोधातील हा लढा पुढेही सुरू राहणार आहे, असा निर्धार नवभारतीय शिव वाहतूक संघटनेने व्यक्त केला आहे.



