ठळक बातम्या

    पालघर जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक ठेवा आता डिजिटल

    पालघर जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक ठेवा आता डिजिटल

    युनेस्कोच्या दिशेने लोकसहभागाची मोहीम नागरिकांनी ‘Bappa.org’वर आठवणी, परंपरा आणि लोककलेचे दस्तऐवजीकरण कराव . जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

     

    पालघर, दि. २० सप्टेंबर २०२६ : पालघर जिल्ह्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या गणेशोत्सवातील विविध प्रथा, लोककला आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे आता डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाची मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने व्यापक लोकसहभागाची मोहीम हाती घेतली असून, पालघरकरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.3सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व संचालनालयामार्फत ‘Bappa.org’ हे विशेष पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यातील गणेशोत्सवाच्या विविध पैलूंचे डिजिटल दस्तऐवजीकरण केले जात आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळे, कलावंत, बचत गट तसेच गृहनिर्माण संस्था आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ आणि माहिती या पोर्टलवर अपलोड करू शकतात.

    घरगुती परंपरांपासून लोककलेपर्यंत दस्तऐवजीकरण

    गणेशोत्सवातील कौटुंबिक विधी, पारंपरिक पूजा, नैवेद्य व खाद्यपरंपरा, पारंपरिक सजावट, सामाजिक संदेश देणारे देखावे, ऐतिहासिक परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची माहिती या उपक्रमातून नोंदविता येणार आहे. त्याचबरोबर भजन, कीर्तन, ढोल-ताशा, संगीत आणि अन्य लोककलांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.पालघरच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असलेल्या पारंपरिक मूर्तिकार, कारागीर, शाडूच्या मूर्ती बनविणारे कलावंत तसेच स्थानिक लोककला आणि परंपरा यांची माहितीही या माध्यमातून जतन करता येणार आहे. त्यामुळे आजच्या गणेशोत्सवातील सांस्कृतिक वैविध्य भविष्यातील पिढ्यांसाठी डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.

    सहभागी नागरिकांना ‘डिजिटल सांस्कृतिक वारसा जतन प्रमाणपत्र’या मोहिमेत नोंदणी करून आपल्या गणेशोत्सवाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळे, बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांना महाराष्ट्र शासनातर्फे ‘डिजिटल सांस्कृतिक वारसा जतन प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

    पालघर जिल्ह्याला समृद्ध लोककला, आदिवासी संस्कृती आणि विविध सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून या परंपरांचे व्यापक दस्तऐवजीकरण झाल्यास पालघरची सांस्कृतिक ओळख देशासह जगासमोर पोहोचण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या व्यापक प्रसारासाठी प्रसारमाध्यमांनीही महत्त्वाची भूमिका बजावावी आणि अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

    फोटो-व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

    गणेशोत्सवाच्या या जागतिक दस्तऐवजीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या अधिकृत पोर्टलचा वापर करावा. तसेच WhatsApp क्रमांक 9136172681 वरूनही गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ सादर करता येणार आहेत.पालघरच्या गणेशोत्सवातील परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक ठेवा डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *