गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांची धडक कारवाई : १६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जण अटकेत…

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि)

बोईसर| गणेशोत्सव जवळ येताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पालघर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत तब्बल १६ लाखांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुटखामाफियांना थेट इशाराच दिला आहे.

महामार्गावर रंगले ऑपरेशन – संशयित टेम्पो थेट जाळ्यात

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हिमाचल पंजाब ढाब्याजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी DD03R9277 क्रमांकाचा आयसर टेम्पो पोलिसांच्या हाती लागला. तपासणीअंती या टेम्पोतून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला तब्बल ₹६,०६,१००/- किमतीचा गुटखा सापडला. वाहनासह जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल ₹१६,०६,१००/- इतकी निघाली.

हे आहेत अटकेतले आरोपी :

१) मोहम्मद अरबाज जमीरउल हक (२२ वर्षे, चालक, प्रतापगड, उत्तरप्रदेश)
२) दिलशाद शमशाद अली (२० वर्षे, चालक, प्रतापगड, उत्तरप्रदेश)
३) नेनाराम छबुजी गुजर (४८ वर्षे, व्यापारी, राजसमंद, राजस्थान)

या तिघांविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८६/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २३, २६ (२), २६ (२)(iv), २७, ३० (२)(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईत पोलिसांचा सिंहाचा वाटा

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोउपनि स्वप्नील सावंत देसाई, पोउपनि जितेंद्र कांबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी भगवान आव्हाड, बजरंग अमनवाड, नरेश घाटाळ, विशाल कडव यांनी केली.

गणेशोत्सवात ‘गुटखा-दरबार’ चालणार नाही!

गणेशोत्सव हा श्रद्धा आणि संस्कारांचा सण आहे. मात्र अशा काळात जिल्ह्यात गुटखामाफियांचा धंदा वाढू नये म्हणून पालघर पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. गुटखामाफियांचा “दरबार” गणेशोत्सवात नाही तर तुरुंगातच भरेल, हा संदेश या धडक कारवाईतून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *