प्रतिक मयेकर (प्रतिनिधि)
बोईसर| सरावली ग्रामपंचायतीतील निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आदर्शनगरसह वॉर्ड क्र. क व ड या भागांत तर परिस्थिती अधिकच बिकट असून, नागरिकांना ४–४ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. इतक्या मोठ्या गावात पाण्याची अशी दुरवस्था निर्माण होणे ही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेची थेट साक्ष असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
पावसाळ्यातच टंचाई – उन्हाळ्यात काय होणार?
पावसाळ्यातील या भीषण टंचाईमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. “आज पावसाळ्यातही लोकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असतील, तर उन्हाळ्यात काय अवस्था होईल, याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो,” असे ग्रामस्थ म्हणतात.
गावातील महिलांना डोक्यावर घागरं घेऊन लांबवरून पाणी आणावे लागत असून, विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. “हे दृश्य एखाद्या दुष्काळग्रस्त भागातील आहे की खरोखरच पावसाळा सुरू आहे?” असा टोकदार सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ग्रामपंचायत व प्रशासनावर गंभीर आरोप
पाण्याच्या समस्येबाबत ग्रामस्थ व समाजसेवकांनी वारंवार निवेदनं दिली, अधिकारी व पंचायतीकडे धाव घेतली. मात्र, संबंधित विभाग आणि सरावली ग्रामपंचायत यांनी कानाडोळा करून लोकांना तहानेने होरपळत ठेवले. परिणामी नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
अमोल गरजे यांचा इशारा – आमरण उपोषण
समाजसेवक अमोल गरजे यांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट शब्दांत सांगितले –
“सरावली ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे लोकांना हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. हा प्रशासनासाठी लाजेचा काळा डाग आहे. जर ८ सप्टेंबरपर्यंत ठोस उपाययोजना झाली नाही, तर मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण तहानलेल्या नागरिकांच्या न्यायासाठी असेल आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.”
गावकऱ्यांचा एकमुखी निर्धार
गावकऱ्यांनी देखील प्रशासनाला धारेवर धरत स्पष्ट केले –“आता आमचा संयम संपला आहे. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आम्ही शेकडो ग्रामस्थ उपोषणात सामील होऊन मोठे आंदोलन छेडू. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास त्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत व प्रशासनावर असेल.”
प्रशासनाची खरी कसोटी
सरावलीसारख्या मोठ्या गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतक्या हालअपेष्टा सहन कराव्या लागणे ही शासन-प्रशासनाची मोठी लाजीरवाणी बाब आहे. शहरीकरणाच्या वेगाने बदलणाऱ्या काळात गावकऱ्यांना अजूनही “घागर संस्कृती” अनुभवावी लागत आहे. जर शासन-प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही, तर सरावलीतील पाणीप्रश्न हा आंदोलनाच्या ज्वाळांमध्ये भडकून प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. तहानलेल्या नागरिकांच्या या लढ्याला गावागावांतून पाठिंबा मिळाल्यास, हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.



