पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज
दिनांक : 21 सप्टेंबर 2025
सफाळा बाजारपेठेत रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली असून तब्बल ६ दुकाने जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुकानदारांनी व्यवसायासाठी ठेवलेला माल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू व खाद्यपदार्थ क्षणार्धात जळून खाक झाले. घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक दुकानदार भावूक झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पाणी व उपलब्ध साधनांच्या मदतीने आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीच्या तीव्रतेपुढे सारे प्रयत्न फोल ठरले. अग्निशमन दल, पोलीस व नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन शेवटी आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे झालेलं आर्थिक नुकसान कोट्यवधींच्या घरात गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, बाजारपेठेत फायर सेफ्टी यंत्रणा, अलार्म सिस्टीम व अग्निशमन उपकरणांची सोय तातडीने करण्यात यावी. अन्यथा भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
✍️ पालघर नागरिक संपादक : जावेद लूलानिया.



