पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर हे औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत असतानाच, त्याच बोईसरच्या नवापुर नाक्याजवळील सहारा हॉटेल एन्क्लेव्हच्या अंधाऱ्या खोलीत चालणारा देहविक्रीचा घाणेरडा बाजार पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, विकासाच्या गोंगाटात काही प्रवृत्ती समाजाच्या प्रतिष्ठेवर गंज लावणाऱ्या आहेत आणि त्यांचा डामडौल फक्त पैशाच्या जोरावर चालतो.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून सापळा रचला. डमी ग्राहक पाठवून सत्याचा पर्दाफाश केला असता, हॉटेल मॅनेजर विनय जयकिसन धुपर हा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तरुण महिलांचा वापर करून देहव्यापाराचा घाणेरडा खेळ रचत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. पंजाबहून येऊन पालघरमध्ये मॅनेजरच्या आड दडलेला हा धंदा केवळ कायद्याचा भंग नव्हे, तर समाजाच्या आत्म्यावर केलेला घाव आहे.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत तीन महिलांना तातडीने वाचवले आणि रेस्क्यू फाउंडेशनमध्ये दाखल केले. परंतु प्रश्न असा की — हे हॉटेल इतक्या दिवसांपासून प्रशासनाच्या नजरेआड कसे चालू राहिले? पोलिसांच्या गस्तीतून सुटून हा धंदा इतक्या निर्धोक पद्धतीने कसा वाढला? या प्रश्नांची उत्तरे आज जनता मागत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय धाडसी पाऊल उचलले हे कौतुकास्पद आहेच; पण त्याचवेळी जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली चालणाऱ्या अशा गुन्हेगारी अड्ड्यांवर आता मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई होणे गरजेचे आहे. समाजातल्या अबलांवर व्यापाराचे सावट घालणाऱ्यांना फक्त तुरुंगात टाकणे नव्हे, तर त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
बोईसरसारख्या औद्योगिक नगरीत तरुणाई रोजगाराच्या संधी शोधत असताना, त्याच शहरात काही प्रवृत्ती महिलांच्या अस्मितेवर बोली लावत आहेत. हे चित्र जितके लाजिरवाणे आहे तितकेच चिंताजनक देखील आहे. त्यामुळे ही कारवाई ही केवळ एका प्रकरणाची धडक नाही, तर समाजाला दिलेला इशारा आहे — “अशा घाणेरड्या धंद्यांना आता पालघरची माती सहन करणार नाही!”



