प्रतिक मयेकर, पालघर
बोईसर| सरावली ग्रामपंचायत हद्दीतील तलावाभोवती सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पेव्हर ब्लॉक, वॉकींग ट्रॅक आणि सेल्फी पॉईंट तयार केला. हा प्रकल्प “आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४” अंतर्गत करण्यात आला, ठेकेदाराचे नाव, काम पूर्णतेची तारीख आणि अंदाजित खर्च यासह अभिमानाने लावलेला फलक आजही तिथे ताठ उभा आहे. पण फलकाखालील दृश्य प्रशासनाच्या खोट्या विकासाचे जिवंत दर्शन घडवतं — कारण वॉकींग ट्रॅकवर चालणाऱ्यांपेक्षा तिथे पडलेल्या बिअरच्या बाटल्यांची संख्या जास्त आहे!
तलावाभोवती पसरलेली घाण, झाडांची कोरडी पानं, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे पॅकेट्स आणि दुर्गंधीचा प्रादुर्भाव — हे सर्व चित्र त्या विकास फलकाला चेष्टेचा विषय बनवत आहे. लोकांच्या कराच्या पैशातून उभारलेला हा तलाव आज “सुशोभीकरण” पेक्षा “बेशिस्तपणाचा” दाखला बनला आहे.

वॉकींग ट्रॅक तयार करून त्यावर एकदाच फोटो काढले आणि त्यानंतर कोणी मागे वळून पाहिलंच नाही — अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन दोन्ही यंत्रणा या प्रकल्पाची देखभाल पूर्णपणे विसरल्या आहेत. तलावाभोवतीच्या झुडपांमधून दुर्गंधी येते, तर रात्रीच्या वेळी येथे दारू प्यायची टोळकी जमतात. महिलांना, वृद्धांना आणि मुलांना या परिसरात चालणेही असुरक्षित बनले आहे.
आणि हे सर्व सुरू असताना आज छठपूजेचा दिवस — जिथे तलाव स्वच्छ, सुशोभित आणि पवित्र असायला हवा होता, तिथे मात्र कचरा, घाण आणि निष्काळजीपणाचं दर्शन झालं. श्रद्धाळू नागरिकांनी स्वतः झाडू मारून जागा स्वच्छ केली, पण ग्रामपंचायत प्रशासनाकडून एकही कर्मचारी, एकही ट्रॅक्टर, एकही उपक्रम दिसला नाही. ग्रामपंचायत फक्त नावापुरती, तर सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त फलकापुरता उरला आहे.

हा तलाव सुशोभीकरणासाठी होता, पण आज तो घाणेरड्या व्यवस्थापनाचा नमुना बनला आहे. प्रशासनाकडून ना सुरक्षा व्यवस्था, ना सीसीटीव्ही, ना साफसफाई — फक्त एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे उदासीनता. विकासाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या देखभालीसाठी ना निधी, ना योजना, ना जबाबदारी निश्चित केली गेली. आणि मग काय, नागरिकांसाठी असलेला तलाव आता मद्यपींसाठी ठरला स्वर्गसदृश जागा!
हा प्रकार फक्त सरावलीपुरता मर्यादित नाही; पण तो येथे ठळकपणे दिसतो कारण नागरिक आता मौन बाळगत नाहीत. हा प्रकल्प नागरिकांच्या पैशातून उभा राहिला, आणि आता त्या पैशाचा अपमान प्रशासनाच्या बेफिकीरीने केला जातोय.

सरावली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही संस्थांना आता नागरिक विचारतात —”फक्त फलक उभारून फोटो काढायचे की विकासाची जबाबदारीही घ्यायची?” जर प्रशासनाने आता तात्काळ हालचाल केली नाही, तर नागरिकच यंत्रणेला जागं करतील. कारण जनता शांत आहे, पण आंधळी नाही. सरावली तलावाचं सुशोभीकरण फक्त नावालं राहिलं आहे —आता वेळ आली आहे या ‘नावाच्या विकासाला’ वास्तविक जबाबदारीच्या चौकटीत आणण्याची!



