आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका.
शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावर संडासाचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून बाजूलाच मस्जिद असल्यामुळे नागरिक, नमाजी बांधव, महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. सांडपाण्यामुळे रस्ता घसरडा झाल्याने कुठल्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येबाबत शिरगाव ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतचे हे सरळसरळ दुर्लक्ष असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता, आजार पसरण्याची भीती, ज्येष्ठ नागरिक घसरून पडण्याचा धोका तसेच मस्जिदमध्ये नमाजासाठी येणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सांडपाण्यामुळे एखादा अपघात झाला किंवा जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ग्रामपंचायत की संबंधित इमारतीचे मालक? ग्रामपंचायतकडून दखल न घेतल्याने अखेर 112 वर फोन करून पोलीस प्रशासनाला घटनास्थळी बोलावण्यात आले व प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून देण्यात आली आहे. त्वरित जर हे सांडपाणी बंद करण्यात आले नाही, तर ज्या इमारतीमधून हे सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे, त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी कडक मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघात, रोगराई किंवा कोणतीही हानी झाल्यास संबंधित इमारत, रहिवासी तसेच दुर्लक्ष करणारी ग्रामपंचायत यांना जबाबदार धरावे, अशीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
दिनांक : 21/01/2026
पालघर नागरिक संपादक : जावेद लुलानिया..पालघर



