रेड अलर्ट असूनही शाळा सुरू… पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाची गंभीर दखल कुठे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्यक्रम महत्त्वाचे ठरले का?
२३ जुलै २०२६ | गुरुवार
पालघर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) २२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:५० वाजता रेड अलर्ट जारी करून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.मात्र, या गंभीर परिस्थितीतही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेड अलर्ट असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम तसेच पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे नियोजित कार्यक्रम अधिक महत्त्वाचे ठरले का?
पालकमंत्री गणेश नाईक यांनी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला होता का? शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय कोणाच्या शिफारशीवर घेण्यात आला? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणते निर्देश देण्यात आले? या सर्व बाबींवर नागरिक अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी करत आहेत.जिल्हा प्रशासनानेही अद्याप शाळा सुरू ठेवण्यामागील निकष आणि निर्णयप्रक्रिया सार्वजनिक केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रेड अलर्ट असताना विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत पाठविण्याची वेळ का आली? या निर्णयाची जबाबदारी कोण स्वीकारणार? पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रश्नांची पारदर्शकपणे उत्तरे देऊन नागरिकांच्या शंका दूर कराव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
PN24 NEWS | जाग महाराष्ट्र | पालघर नागरिक
संपादक : जावेद मजीद लुलानिया



