ठळक बातम्या

आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प

पालघरमध्ये भक्ती आणि समाजजागृतीचा अनोखा संगम;

आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प

रोटरी क्लब ऑफ पालघर आणि ईनर व्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी ‘आषाढी एकादशी दिंडी उत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पारंपरिक दिंडी सोहळ्याला भक्तीसोबतच समाजजागृतीची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची प्रभावी जोड देत भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृती हा सामाजिक संदेश देण्यात आला.

भेसळमुक्त अन्नासाठी सामूहिक संकल्प

यंदाच्या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे “भेसळयुक्त अन्नाचा करू बिमोड” ही जनजागृती मोहीम. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत, समाजात वाढत चाललेल्या भेसळयुक्त अन्नाच्या समस्येविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

विठ्ठल भेटीची ओढ, दिंडी हीच जोड…

भेसळयुक्त अन्नाचा, करू सर्वांनी मिळून बिमोड…!

या घोषवाक्याद्वारे भेसळमुक्त अन्न, निरोगी कुटुंब आणि सुदृढ समाज घडविण्याचा संकल्प करण्यात आला.

भक्तिरसात न्हालेली दिंडी

आज सकाळी ७.०० वाजता आर्यन हायस्कूल येथून दिंडीला प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “राम कृष्ण हरी” च्या अखंड जयघोषात दिंडीने विठ्ठल मंदिर, पालघरपर्यंत मार्गक्रमण केले. महिला, युवक, बालमित्र आणि पालघरकर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवला.

मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पालघरचे प्रेसिडेंट रो. भूषण दा. सावे, सेक्रेटरी रो. अमित अ. पाटील, प्रोजेक्ट चेअरपर्सन रो. प्रशांत पाटील, को-प्रोजेक्ट चेअरपर्सन रो. नारायण गिरासे तसेच ईनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या प्रेसिडेंट अनुश्री आव्हाड, सेक्रेटरी मृदुला सावे, प्रोजेक्ट चेअरपर्सन सोनाली पाटील आणि को-प्रोजेक्ट चेअरपर्सन सुनिता गिरासे यांनी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी दोन्ही क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, म नी दांडेकर शेळेचे विदयार्थी व शिक्षक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भक्ती, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम घडवणारा हा ‘आषाढी एकादशी दिंडी उत्सव’ पालघरकरांसाठी प्रेरणादायी ठरला. समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी भेसळमुक्त अन्नाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *