देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज होण्याचे आमदार राजेंद्र गावित यांचे आवाहन
पालघर : देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पालघर तालुक्यातील विविध विद्यालयांतील दहावी आणि बारावीमधील इयत्ता १ ते ३ क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पालघर येथील बिडको परिसरातील ओस्तवाल सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आमदार राजेंद्र गावित अध्यक्षस्थानावरून बोलत होते. इंग्रजी मध्यम, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र गावित यांनी, विद्यार्थ्यांनी केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. “यश मिळवण्यासाठी कष्ट, सातत्य आणि जिद्द आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी. पालकांनी मुलांवर जबरदस्तीने करिअरची दिशा लादू नये, तर त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन द्यावे,” असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेताना गावित म्हणाले की, आपल्या कार्यकाळात पालघर जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
पालघर जिल्हा निर्मितीसाठीही अनेक अडचणींवर मात करत प्रयत्न केल्याचे सांगत, “मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचा विरोध असतानाही मी ठाम राहिलो. जिल्हा निर्मितीनंतर अनेक शासकीय कार्यालये सुरू झाली असून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. समाजहितासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख करत, आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी कार्य करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात ट्रस्टचे उपाध्यक्ष कल्पक पाटील, शिवसेना प्रवक्ते केदार काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, देवमोगरा ट्रस्टचे सुभाष चौधरी, उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री. पाटील, कार्यकर्ते प्रदीप यादव, प्रसिद्ध निवेदिका प्रतिभा क्षीरसागर, कमलेश वारय्या, नायब तहसीलदार संभाजी पावरा, जयेश जानी, उद्योजक यशवंत लोढा यांच्यासह विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुंदन संखे आणि केदार काळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



