बोईसरमध्ये वाहतूक शिस्तीचा बोजवारा : नंबरशिवाय, सिग्नलशिवाय ट्रक धावतात – पोलीस व आरटीओ बेफिकीर
📍बोईसर
प्रतिक मयेकर
बोईसर प्रतिनिधी :
बोईसर परिसरात वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळणारे प्रकार सर्रास दिसत आहेत. रात्रीच्या वेळी क्रमांकफलक (नंबरप्लेट) नसलेली तसेच मागील सिग्नल दिवे बंद असलेली जडवाहने रस्त्यावर बेधडक धावत आहेत. यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होत असूनही वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकारी मात्र गप्प बसले आहेत.
छोट्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर मात्र पोलिसांचा गंडांतर नेहमीच चालू असतो. हेल्मेट नसेल तर तात्काळ दंड, सीटबेल्ट नसेल तर चालान, कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी असली तरी तात्काळ कारवाई – पण याच पोलीस यंत्रणेला नंबरशिवाय आणि सिग्नलशिवाय मोठे ट्रक मात्र ‘अदृश्य’ होतात.
धोक्याची भीषण स्थिती
– अपघात झाल्यास नंबर नसल्याने जबाबदार वाहन शोधणे अशक्य.
– अंधारात सिग्नल दिवे बंद असल्याने समोरच्या वाहनचालकांचे प्राण धोक्यात.
– रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
नागरिकांचा रोखठोक सवाल
“आमच्या स्कूटरवरचा छोटासा इंडिकेटर बंद असेल तरी पोलीस थांबवतात. मग नंबरशिवाय आणि सिग्नलशिवाय ट्रक पोलिसांना का दिसत नाहीत? मोठ्या वाहनांना कुणाचा वरदहस्त आहे का?” – असा सवाल बोईसरकर करत आहेत. हे दृश्य म्हणजे प्रशासनाची उघड बेपर्वाई आहे. वाहतूक पोलीस केवळ लहान वाहनांवर आकडे पूर्ण करण्यापुरतेच कारवाई करत आहेत. आरटीओ अधिकारी मात्र फक्त कागदोपत्री कामगिरी दाखवण्यात व्यस्त असल्याचे चित्र उभे राहत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचा जीव धोक्यात घालून बेकायदेशीर वाहनं रस्त्यावर मोकाट फिरत असतील, तर त्याला थेट प्रशासनाची मूक परवानगी समजली जाईल



