ठळक बातम्या

    पालघर :: तलासरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : अवैध विदेशी दारूसह ₹30.79 लाखांचा मुद्देमाल जप्त

    पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.

    पालघर :: तलासरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : अवैध विदेशी दारूसह ₹30.79 लाखांचा मुद्देमाल जप्त­

    पालघर | दि. 6 ऑगस्ट 2026

    पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे दिलेल्या निर्देशानुसार तलासरी पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळविले आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पालघर व तलासरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला.

     

    पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार GJ-03-AZ-8544 क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी दारूची वाहतूक केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली असता, सिमेंट ब्लॉकच्या मागे लपवून ठेवलेली ₹10,79,480 किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह एकूण ₹30,79,480 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी गुजरात राज्यातील पोरबंदर येथील अवलाभाई काराभाई खोडीयातर (वय 23 वर्षे) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 232/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डहाणू विभाग) श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पाटील, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. संदीप गीते, पोलीस अंमलदार राहुल क्षत्रिय (पो.अं. 936), विशाल लोहार (पो.अं. 888), पोलीस उपनिरीक्षक योगिता गुजर, अनिल सोनवणे (पो.हवा. 940), इरफान लांबे (पो.शि. 354) आणि योगेश सर्वे (पो.शि. 160) यांनी सक्रिय सहभाग घेत ही यशस्वी कारवाई केली.

    अवैध दारू तस्करीविरोधात पालघर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *