विराज कंपनीत कामगार मुजाहिद शेख ठार – कुटुंब उद्ध्वस्त, नंबर प्लेटविना वाहनं व प्रदूषणाचे साम्राज्य; यामागे कुणाचा आशीर्वाद?

📍बोईसर

प्रतिक मयेकर

तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा रक्ताने लाल झाली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीच्या टायर दुकानात झालेल्या भीषण अपघातात कामगार मुजाहिद शेख (रा. बोईसर) याचा जागीच मृत्यू झाला. कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात टायरची लोखंडी रिंग डोक्यावर आदळली आणि मुजाहिदचा मृत्यू झाला.

घरचा आधारच हिरावला!
मुजाहिद शेख हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते. घर चालवण्यासाठी ते दिवसरात्र कष्ट करत होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “आमचा कर्ता गेला, आता आमचं काय?”

सुरक्षेची साधनं नाहीत, प्रशिक्षण नाही – मग कामगारांचे जीव कोण वाचवणार?
कामगारांच्या म्हणण्यानुसार, कंपनीत सुरक्षेच्या साधनांची गंभीर उणीव आहे. योग्य प्रशिक्षण, सुरक्षित यंत्रणा आणि दक्षता घेतली असती तर मुजाहिदचा जीव वाचला असता. पण कंपन्यांना कामगाराचे प्राण महत्त्वाचे नसून, फक्त उत्पादन आणि नफा महत्त्वाचा आहे, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले.

नंबर प्लेटविना वाहनं, प्रदूषणाचे साम्राज्य!
विराज कंपनीच्या काही वाहनांना नंबर प्लेटच नाही. ही वाहने खुलेआम बोईसरच्या रस्त्यांवर धावत असताना ना वाहतूक पोलीस थांबवतात, ना प्रशासन दखल घेतं. एवढेच नव्हे, तर कंपनीकडून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिक व कामगारांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. प्रश्न असा – कंपनी एवढ्या बेकायदेशीर गोष्टी करूनही निर्धास्तपणे कशी सुरू आहे? यामागे कुणाचा आशीर्वाद आहे?

प्रशासन झोपेत की जाणीवपूर्वक डोळेझाक?
तारापूर एमआयडीसीत यापूर्वीही गॅसगळती, आगी, स्फोट अशा घटना होऊन अनेकांनी प्राण गमावले. पण अद्यापही एकाही मोठ्या अधिकाऱ्याला वा कंपनीला ठोस शिक्षा झालेली नाही. “चौकशी सुरू आहे” हे जुने वाक्य सांगून सर्व प्रकरणे मिटवली जातात. यामुळेच कंपन्यांचा बेकायदेशीर व धोकादायक कारभार फोफावत आहे.

मुजाहिदचा मृत्यू अपघात नाही – तो बेपर्वाईचा बळी आहे!
आज मुजाहिद शेखचा मृत्यू हा फक्त एका कुटुंबाचा आधार हिरावून नेणारा प्रसंग नाही, तर तो संपूर्ण कामगार वर्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे. प्रशासनाने आता तरी जबाबदारी स्वीकारून दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर तारापूर एमआयडीसीला “कामगारांचे स्मशानभूमी” म्हटलं जाईल, यात शंका नाही.

🟥 जबाबदार कोण?

🔹 कंपनी व्यवस्थापन – सुरक्षा साधनांची व प्रशिक्षणाची उणीव ठेवून थेट कामगाराच्या जीवाशी खेळ केला.
🔹 प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) – कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाकडे सातत्याने दुर्लक्ष.
🔹 वाहतूक विभाग / आरटीओ – नंबर प्लेटशिवाय फिरणारी विराजची वाहने का थांबवली जात नाहीत?
🔹 स्थानिक पोलिस – बेकायदेशीर कृत्ये डोळ्यांदेखत सुरू असूनही मौन.
🔹 कामगार विभाग – कामगार सुरक्षेचे नियम फक्त कागदावर; प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य.
🔹 राजकीय आशीर्वाद? – एवढ्या उघड बेकायदेशीर गोष्टी असूनही कंपनीवर कारवाई होत नाही, याचा अर्थ कुणीतरी मोठा हातभार आहे का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *