गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा गुटखा माफियांवर धडाकेबाज सापळा – तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिक मयेकर
बोईसर| गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि कायदा अंमलबजावणी यासाठी पालघर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत नुकत्याच केलेल्या धाडीत तब्बल ३२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांच्या गळचेपीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.
दिनांक ३ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, लाल रंगाचा आयसर कंपनीचा टेम्पो (MH10-DT-6633) या वाहनातून राज्यात बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे. तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकासह मिळून मौजे तलासरी येथील इभाडपाडा ओव्हरब्रिजजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काटेकोर नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान सदर टेम्पो हेरून थांबविण्यात आला.
वाहन चालक बाळू किसन गंगावणे (वय ५०, रा. सांगली) आणि त्याचा साथीदार राजु संजय कांबळे (वय २७, रा. सांगली) यांनी सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. वाहनात कोल्हापूर येथील दोन कंपन्यांचा फ्रोजन फुड माल असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूचे तब्बल २० लाख ९६ हजार ५५० रुपयांचे पॅकेट्स आढळून आले. वाहनासह एकूण ३२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता सन २०२३ अंतर्गत तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या विविध कलमानुसार कठोर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोनि प्रदिप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पोनि अजय गोरड (तलासरी पोलीस ठाणे), श्रेपोउपनि/राजड, पोहवा चौरे, पोअं घरत, पोअं नरेश घाटाळ आणि पोअं बजरंग अमनवाड यांनी सहभाग नोंदवला.
गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेली ही कारवाई जिल्ह्यातील गुटखा माफियांना मोठा झटका देणारी ठरली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणि शांत वातावरण मिळावे, या उद्देशाने पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे, हे स्पष्ट झाले आहे



