“सरकारी गाडी जनता चालवते… अधिकारी तर फक्त ब्रेक धरतात!”
प्रतिक मयेकर,पालघर
बोईसर| डेपोचा कारभार आता इतका गोंधळलेला झाला आहे की, प्रवाशांना विचारावं वाटत—“ही एस.टी. सेवा चालवली जाते की थांबवली जाते?” एकेकाळी महसुलात वर असलेला बोईसर डेपो आज अक्षरशः तोट्याच्या गर्तेत गेला आहे, आणि त्याचं मूळ कारण म्हणजे अधिकारी वर्गाचा निष्काळजी व बेजबाबदार कारभार.
दिवस-रात्र रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या थांबल्या, पण अधिकारी मात्र अजूनही जागे झालेले नाहीत. नरसोबाचीवाडी, तुळजापूर, स्वारगेट, पाटोदा या महत्त्वाच्या मार्गांच्या बस गाड्या बंद पडल्या, आणि त्याचा थेट फटका हजारो प्रवाशांना बसतो आहे. या गाड्या केवळ सोयीच्या नव्हत्या — त्या डेपोच्या महसुलाचा कणा होत्या. पण डेपो प्रशासनानेच त्या गाड्यांचे चाक थांबवले! रात्रराणी गाड्यांचा प्रवास हा आता प्रवाशांसाठी ‘कष्टयात्रा’ ठरतो आहे. १२ तासांचा प्रवास १६-१७ तासांपर्यंत पोहोचतो, आणि त्या दरम्यान अधिकारी वर्ग फोन उचलण्याचंही कष्ट घेत नाही. महामार्गावर गाडी बिघडली, तर प्रवासी व चालक दोघेही काळोखात अडकलेले दिसतात — पण बोईसर डेपोच्या अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही.
अगार व्यवस्थापक इजाज शेख यांच्याकडे डेपोचा कारभार आहे, पण त्यांचे लक्ष व्यवस्थापनावर आहे की फक्त कागदावर सही करण्यावर — हा प्रश्न उपस्थित होतो. सकाळच्या वेळेस कुठलाही अधिकारी आगारात नसल्याने लांब पल्याच्या गाड्या उशिरा सुटतात, फेऱ्या रद्द होतात, प्रवासी बसस्टँडवर वाट पाहत राहतात. याला कोण जबाबदार?रात्रभर धावणाऱ्या गाड्या थांबल्या, प्रवासी थांबले, पण अधिकारी मात्र ‘फोन सायलेंट’वर ठेवून गाढ झोपेत.ही जबाबदारीची लाजिरवाणी अवस्था आहे.
रजा देताना काही कर्मचाऱ्यांना तासनतास उभं ठेवलं जातं, काही निवडकांना लगेच मंजूर केली जाते — म्हणजे डेपोमध्ये नियम नाही, तर “मर्जी” चालते. त्याचा परिणाम म्हणजे कर्मचारी असंतोष आणि डेपोतील शिस्तीचा ऱ्हास. पण प्रशासन तरी कुठे हललं? अजूनही सगळं “सामान्य” असल्याचं दाखवलं जातं. ग्रामीण फेऱ्यांचं वेळापत्रक अस्ताव्यस्त झालं आहे. दुपारच्या वेळेस प्रवासी थांब्यावर गाड्यांची वाट बघतात, पण गाड्याच येत नाहीत. प्रवासी त्रस्त, वेळ वाया, पण अधिकारी वर्ग मात्र हवेत!
प्रश्न आता फक्त एवढाच उरतो — हे अधिकारी नेमके कोणासाठी आहेत? प्रवाशांसाठी की स्वतःच्या ‘सोयीसाठी’?कारण जबाबदारीचा विषय आला की सगळे गप्प होतात. कारवाईचा प्रश्न आला की वरपासून खालीपर्यंत शांतता. मग लोक विचारतात — “हे कोणाचे जावई आहेत का?”
बोईसर डेपोचा कारभार इतका ढासळला आहे की, आता तो केवळ बस डेपो राहिलेला नाही, तर निष्क्रियतेचं प्रतीक बनला आहे.प्रवाशांचा संयम संपला आहे.आणि जर प्रशासनाने या परिस्थितीकडे तत्काळ लक्ष दिलं नाही, तर डेपो नव्हे —संपूर्ण परिवहन विभाग कोसळेल!आज प्रश्न गाडी सुटण्याचा नाही,प्रश्न आहे जबाबदारी थांबण्याचा. आता जनता विचारते आहे — “बस बंद का? आणि अधिकारी मोकळे का?”



