जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

दिनांक 16/10/2025

जिल्हा परिषद पालघर

दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवणे ही आपली जबाबदारी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड

“दिव्यांग हे ‘अक्षम’ नाहीत, तर ‘विशेष सक्षम’ आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांप्रती आपली संवेदनशीलता वाढवली पाहिजे. त्यांना सन्मानाने वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले.

जिल्ह्यातील राज्य शासन व केंद्र शासनाच्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे ‘दिव्यांगाप्रति संवेदनशीलता जागृती एकदिवसीय कार्यशाळेचे’ आयोजन आज लोकशाहीर आत्माराम पाटील सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड होत्या. विशेष अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक यतीन देशमुख उपस्थित होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद शरीकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे तसेच विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेत कर्मचारी आणि दिव्यांग प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. दिव्यांगांच्या हक्कांविषयी, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

विशेष अतिथी यतीन देशमुख म्हणाले, “शासकीय यंत्रणेतील अधिकारी म्हणून आपण दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सरकारी योजना जर खरोखरच दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या, तर त्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडू शकतो. माझ्या वडिलांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता, परंतु शासनाच्या योजनांचा लाभ मिळाल्याने त्यांनी शिक्षण घेऊन आम्हाला सक्षम आयुष्य दिले. दिव्यांगासोबत वागण्याची सुरुवात आपल्या कार्यालयातूनच झाली पाहिजे – त्यांना व्हीलचेअर किंवा सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे म्हणाले, “दिव्यांगांसाठी असलेली निधीची तरतूद योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून त्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेतले पाहिजे. समावेशक विकासासाठी ही दिशा महत्त्वाची आहे.”

मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या एक टक्का व पाच टक्का राखीव निधीबाबत तसेच नाविन्यपूर्ण योजनांविषयी माहिती दिली. सहायक आयुक्त (कौशल्य विकास) रेणुका तम्मलवार यांनी त्यांच्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे विवरण केले.

प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांविषयी माहिती देत सर्व अधिकाऱ्यांनी दिव्यांगांबाबत संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन केले.

या वेळी उपस्थित सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागात दिव्यांगांसाठी असलेल्या विविध तरतुदी आणि सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेश चव्हाण यांनी केले.

या कार्यशाळेद्वारे दिव्यांग कल्याणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करून ‘समावेशक विकासा’कडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यशाळा उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *