प्रतिक मयेकर,पालघर
बोईसर | मधुर नाका परिसरातून रोज सकाळ-संध्याकाळ धोकादायक दृश्यं दिसतात — तीन-तीन मजली कचऱ्याचे पोते बांधलेली पिकअप वाहने रस्त्यावरून निर्धोकपणे फिरतात. ही वाहनं केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण करत नाहीत, तर कुठल्याही क्षणी अपघात घडवू शकतात. आणि गंमत म्हणजे हे सर्व अगदी ट्रॅफिक पोलिसांच्या नाक्याजवळच घडतं!
या ठिकाणी रोज वाहतूक पोलीस उपस्थित असतात. हेल्मेट नसलेल्या तरुणांना थांबवणं, दुचाकीस्वारांच्या कागदपत्रांची चौकशी करणं, नंबरप्लेटवर लक्ष देणं — हे त्यांचं रोजचं काम झालं आहे. पण रस्त्यावरून ‘डोळ्यांसमोरून’ ओव्हरलोड पिकअप गाड्या जात असल्या तरी त्यांना त्या दिसत नाहीत. कारण? या वाहनांवर कारवाई केली तर जरा धाडस लागेल, जरा त्रास होईल, आणि जरा विचारही करावा लागेल.
मधुर नाक्याजवळची ही अवस्था काही दिवसांची नाही — महिन्यांपासून असाच ‘अनधिकृत मालवाहतूक वाहनांचा’ मिरवणुकीसारखा प्रवास सुरू आहे. रस्त्यावरील विद्युत तारा, सिग्नल खांब, झाडांच्या फांद्या — सगळ्यांना धडक देत ही वाहनं चालतात. कधी कधी एवढं वजन असतं की वाहन डुलतं, बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा जीव अक्षरशः धोक्यात येतो. पण, प्रशासनाला आणि ट्रॅफिक विभागाला जणू त्याचं काहीच पडलेलं नाही. त्यांचं लक्ष फक्त दंडावर, छोट्या चुका पकडण्यावर, आणि लोकांना अडवून ‘टार्गेट पूर्ण’ करण्यावर. नागरिकांच्या सुरक्षेचं ‘टार्गेट’ मात्र शून्य!
या गाड्यांकडे पाहून प्रश्न पडतो — बोईसर ट्रॅफिक विभागासाठी कायद्याचे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी आहेत का? गाडीचा आकार वाढला, तर नियमांचा आकार कमी होतो का? की या वाहनांच्या मागे ‘अदृश्य’ संरक्षण आहे ज्यामुळे कोणीच त्यांना हात लावत नाही? ओव्हरलोड पिकअप वाहनांचा हा बेजबाबदार प्रवास म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. बोईसर शहरात अशा वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होते, पादचारी धोक्यात येतात, आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू राहतो. पण तरीही विभागातील अधिकाऱ्यांच्या कारवाईचा आवाज मात्र शांत आहे.
ट्रॅफिक पोलिसांनी जर खरंच आपलं कर्तव्य पार पाडलं असतं, तर या गाड्या रस्त्यावरून कधीच बंद झाल्या असत्या. पण इथे उलटं चाललंय — बाईकस्वारांच्या डोक्यावर हेल्मेट नाही म्हणून कारवाई, पण ओव्हरलोड गाडीच्या चालकाचं डोकं मात्र कायद्याबाहेर!



