महिन्याभरात बोईसर येथील भूसंपादित शेतकऱ्यांना 7/12 व मालकी हक्क नोंद पूर्ण देऊ
आमदार राजेंद्र गावित यांच्या तारांकित प्रश्नाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर
मुंबई. (प्रतिनिधी) – अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोईसर येथील मौजे राणीशिगाव, हनुमाननगर, चंद्रनगर, शिगाव व गोवणे येथील भूसंपादित शेतकऱ्यांना 7/12 उतारे, मालकी हक्क नोंद व प्रलंबित मोबदला देण्याबाबत आमदार राजेंद्र गावित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार विलास तरे यांनीही सहभाग नोंदवला.
यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना सांगितले की, एकूण 467 खातेदारांपैकी 262 खातेदारांना 7/12 उतारे देण्यात आले आहेत, तर उर्वरित 205 शेतकऱ्यांना महिन्याभरात सीमांकन पूर्ण करून 7/12 उतारे व नकाशे देण्यात येतील. त्यानंतर वाढवण बंदर व बुलेट ट्रेन प्रकल्पात गेलेल्या जमिनींचा मोबदला देण्यात येईल. मोबदल्यासाठी आवश्यक निधी शासनाकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत दिलेले उत्तर म्हणाले की, “याठिकाणी 467 खातेदार आहे. 262 खातेदारांना शासने 7/12 वेगळा दिल्यामुळे त्यांचा प्रश्न आला नाही. मात्र, 205 शेतकरी शिल्लक आहे. महिन्याभराच्या आतमध्ये सर्वांना 7/12 उतारे देऊन त्यांची जमीन जी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन मध्ये प्रकल्पात गेली आहे. तो 7/12 वेगळा झाल्यानंतर कारण हे प्रकरण सन 1980 – 85 पासून सुरू आहे. मी आज याची संक्षिप्त माहिती घेतली. येथे फारच वाईट परिस्थिती आहे म्हणजे तेव्हा जमीन वाटप झाली. आता तर अशी परिस्थिती आहे की, त्यांना विशिष्ट जमीन वाटप केली. त्या विशिष्ट जमिनीचे सीमांकन न केल्यामुळे काही आजूबाजूला पसरले गेले. म्हणजे या शेतकरी च्या जमिनीवर बाजूचा शेतकरी आणि या हा शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अशी वेगवगळे अतिक्रमण करतकरत काहीचे क्षेत्रफळ वाढलं काहीच कमी झाले. या सर्वांचं सीमांकन करून महिन्याभराच्या आतमध्ये 205 शेतकऱ्यांना उर्वरित शेतकरी जे राहिले त्यांना आपण 7/12 वाटप आणि नकाशा वाटप करू आणि त्यानंतर जे बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदर मध्ये जमिनी गेल्या आहे त्यांना जसंच 7/12 आणि याचा नकाशा वेगळा झाला. तसं तो मोबदला मिळेल त्याचा मोबदला शासनाकडे तयार आहे.” या उत्तरामुळे संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



