समता सप्ताहानिमित्त ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा संपन्न
वंचित घटकांच्या सक्षमीकरणाला नवे बळ”
पालघर, दि. १० एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांच्या आधारे भारतीय समाजात एकात्मता निर्माण करण्याचा जो महान प्रयत्न केला, त्याच विचारधारेचा वारसा पुढे नेत राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांद्वारे दुर्बल व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम ४६ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपविण्यात आली असून सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे संरक्षण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच तत्वांच्या अनुषंगाने शासनाकडून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी ८ ते १४ एप्रिल दरम्यान ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जातो. याच उपक्रमाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पालघर यांच्या वतीने ‘मार्जिन मनी योजना’ विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक शुभांगी लोणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांनी योजनांच्या उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन केले. तसेच समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता पानसरे यांनी ‘मार्जिन मनी योजना’ची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तुषार डामसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.



