पालघर जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर, दि. १८ ऑगस्ट २०२५ – भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात दि. १५/०८/२०२५ ते दि. १७/०८/२०२५ या कालावधीत “अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान” राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यात आला.

या अभियानाचे मार्गदर्शन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख (भापोसे) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रॅली, पोस्टर स्पर्धा व मैदानी स्पर्धांचा समावेश होता.

जिल्ह्यातील एकूण ३८ शाळा व महाविद्यालयांमधील ४७४८ विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात भाग घेतला. तसेच १९ ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो नागरिक, स्वयंसेवी संस्था, विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. एकूण १५२ शाळा-महाविद्यालये, पोलीस कर्मचारी, कामगार, महिला समित्या, क्रीडा मंडळे यांचा या अभियानात उत्स्फूर्त सहभाग होता.

या व्यतिरिक्त, पालघर जिल्हा पोलीस दलाने डिजिटल माध्यमातूनही जनजागृती करण्यासाठी Facebook, Instagram, YouTube व X (Twitter) या सोशल मीडियाचा वापर करून मोहीम राबवली.

या उपक्रमामुळे अमली पदार्थविरोधी जागरूकता तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यात मोठे यश मिळाले असून, पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या जनजागृती मोहिमेचे विशेष कौतुक केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *