पालघर पंचायत समितीचे शौचालय – अधिकाऱ्यांची लाज की नागरिकांची शिक्षा?

पालघर पंचायत समितीचे शौचालय – अधिकाऱ्यांची लाज की नागरिकांची शिक्षा?

प्रतिक मयेकर

बोईसर | पालघर पंचायत समितीच्या इमारतीतील शौचालयांची अवस्था पाहिली तर कोणालाही “स्वच्छ भारत अभियान”चा नारा हा फक्त कागदोपत्री आणि फोटोसेशनपुरता आहे हे पटेल. तुटकी दारे, गंजलेली कडी-कोयंडे, पांढऱ्या टाईल्सवर काळे डाग, घाणीचे थर, नळ असूनही पाण्याचा थेंब नाही… हात धुण्यासाठी लावलेले बेसिन मृतासमान उभे. दुर्गंधी तर एवढी की काही क्षण उभं राहणंही अवघड.

मूळ प्रश्न असा – हे शौचालय रोज वापरणारे अधिकारी आंधळे आहेत का? नागरिकांना उपदेश करायला, सभा-समारंभात भाषणं द्यायला, स्वच्छतेचे पोस्टर लावायला मात्र प्रशासन पुढे; पण स्वतःच्या कार्यालयातील शौचालयांकडे पाहायलासुद्धा वेळ नाही. बांधकाम विभागाकडे या शौचालयाची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी आहे. पण वास्तवात येथे केवळ निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराची दुर्गंधी पसरलेली आहे.

नागरिकांचे ज्वलंत प्रश्न

शौचालयात पाणी नाही, स्वच्छता नाही; मग स्वच्छ भारताच्या नावाखाली खर्च झालेले लाखो रुपये गेले कुठे?

अधिकारी याच शौचालयात जातात, मग त्यांनाही ही दुर्गंधी जाणवत नाही का? की जनतेप्रमाणे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो पण “जाणीवपूर्वक गप्प” राहतात?

पंचायत समितीच्या दारातच इतकी दुर्गती असेल तर गावागावच्या अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायतीतील शौचालयांची काय अवस्था असेल?

पालघर पंचायत समितीचे शौचालय म्हणजे प्रशासनाच्या बेफिकीरीचा उघड पुरावा आहे. “स्वच्छता”चे नारे आणि “खरी वस्तुस्थिती” यातील तफावत उघड करणारा हा प्रकार आहे.
जर तातडीने स्वच्छता व दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर या अधिकाऱ्यांना जनतेचा संताप आणि लाजिरवाणी परिस्थिती दोन्हींचा सामना करावा लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *