प्रतिक मयेकर, पालघर
बोईसर| सरावली ग्रामपंचायतीच्या पायाभूत रचनेत लोकशाही हा पाया असतो, पण ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सरावलीत जे घडलं, त्याने हा पाया हादरून गेला. सत्तेच्या खुर्चीवर बसलेला भाजपचा पदाधिकारी आणि सरावली ग्रामपंचायतीचा उपसरपंच शुभम वडे याने अधिकाराच्या नशेत उन्मत्त होऊन ग्रामपंचायतीतील लिपिक संकेत सावंत याच्यावर उघडपणे हल्ला केला, मारहाण केली, आणि सरकारी कार्यालयच रणांगण बनवलं.
ही घटना केवळ एका कर्मचाऱ्यावरील हल्ला नाही — तर लोकशाहीवरची उघड दादागिरी आहे.
ग्रामपंचायतीच्या दरवाज्यातून बाहेर पडणाऱ्या संकेत सावंतवर शुभम वडे आणि त्याच्या साथीदारांनी अचानक झडप घालत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केली. सभोवतालचे कर्मचारी, नागरिक हे साक्षीदार! पण सत्तेच्या नशेत माणुसकीचा पत्ता गेला आणि शासकीय कार्यालयातच दहशतीचं राज्य प्रस्थापित झालं.
“सत्तेवर बसलं म्हणजे गाव आपलं बापाचं का?”
हा प्रश्न आता सरावलीच्या गल्लीबोळात घुमतोय. कारण जनतेने लोकसेवेसाठी निवडून दिलेल्या व्यक्तींनीच जर जनतेच्या सेवकांवर हात उचलायला सुरुवात केली, तर ही व्यवस्था म्हणजे लोकशाही नव्हे — सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी!
पीडित लिपिक संकेत सावंत याने संतापाने म्हटलं —
“मी माझं काम प्रामाणिकपणे करत होतो. पण केवळ माझं कर्तव्य बजावत असताना माझ्यावर हल्ला झाला. आज मला मारलं, उद्या दुसऱ्याला मारतील. आम्ही सरकारी सेवक आहोत, गुलाम नाही. सत्तेचा वापर विकासासाठी व्हावा, दहशत पसरवण्यासाठी नव्हे.”
संकेतच्या या शब्दांमधून केवळ वेदना नाही, तर संपूर्ण प्रशासनाला दिलेला इशारा दडलेला आहे.
सरावलीसारख्या ग्रामपंचायतीत जर कर्मचाऱ्यांवर उपसरपंचच हल्ला करत असेल, तर नागरिक कितपत सुरक्षित राहतील? प्रशासनाच्या दरवाज्यातच जर कायद्याचं उल्लंघन होत असेल, तर न्याय कुठे शोधायचा? आजवर अशा घटना “चौकशी सुरू आहे” या शब्दांमध्ये दडपल्या गेल्या, पण सरावलीतील प्रसंग हा मौन नाही, कारवाई मागतो!
जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी आणि पालघर प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू करून उपसरपंच शुभम वडेवर निलंबनाची कारवाई करावी, अशी नागरिकांची तीव्र मागणी आहे.
ही घटना एका कर्मचाऱ्याच्या गालावर पडलेली चपराक नाही, तर लोकशाहीच्या चेहऱ्यावरचा थप्पड आहे. कारण सत्तेच्या माजात जर उपसरपंच हात उचलतो, तर उद्या एखादा सरपंच गोळी उचलणार नाही याची खात्री कोण देणार?
सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या काही जणांना आज वाटतंय की ग्रामपंचायत म्हणजे त्यांची खास मालमत्ता आहे. पण विसरू नका — जनतेने दिलेल्या मांडटावर जर जनतेचं अपमान केलात, तर तोच जनतेचा हात तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकेल!
प्रशासन गप्प आहे, पोलीस गप्प आहेत, आणि दोषी मोकाट फिरतोय — मग विचार करा, हल्ला लिपिकावर झाला की लोकशाहीवर?
सरावली ग्रामपंचायतीत घडलेली ही घटना गावाच्या सन्मानावरच नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या प्रशासनिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करते.
आज जर शुभम वडेवर कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या प्रत्येक ग्रामपंचायतीत उपसरपंचांचा राज नव्हे, गुंडशाहीचं साम्राज्य उभं राहील.



