आमदार विलास तरे यांची सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना थेट भेट; उच्चस्तरीय चौकशी आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
मनोर, पालघर
प्रतिनिधी : सोहेल खतीब.
मनोर ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणामुळे प्रिती जाधव (वय २२ वर्षे, धुकटण गाव) हिचा मृत्यू झाल्याबाबत तात्काळ चौकशी व जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, प्रशांत गोवारी, सचिन भोईर आणि अक्षय कंडी उपस्थित होते.
आमदार विलास तरे म्हणाले की, धुकटण (ता. जि. पालघर) येथील २२ वर्षीय प्रिती जाधव हिला प्रसूतीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने, या रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अत्यंत गंभीर निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
ही घटना केवळ वैयक्तिक नाही, तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्ट, निष्काळजी आणि असंवेदनशील कार्यपद्धतीचे अत्यंत भयानक उदाहरण आहे.
घटनेचा तपशील असा की, प्रिती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराऐवजी “रुग्णाला लवकर दुसरीकडे घेऊन जा” असा सल्ला दिला. मात्र रुग्णालयात १०८ ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली नाही.
परिणामी, रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर मनाली कोकाटे व डॉक्टर प्रशांत राजगुरू यांनी गंभीर स्थिती पाहूनही जबाबदारी टाळत रुग्णाला बाहेर हलविण्याचा सल्ला दिला, परंतु आवश्यक प्राथमिक उपचार न देता केवळ “दुसरीकडे जा” एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले.
रुग्णाला गुजरात येथील इस्पितळाकडे नेत असताना रस्त्यात ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने ॲम्बुलन्स अर्ध्या रस्त्यातून परत आली. नवा सिलेंडर घेत पुन्हा मार्गस्थ झाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णाचा अतिशय रक्तस्त्राव होऊन रस्त्यातच मृत्यू झाला.
हे सर्व प्रशासन आणि डॉक्टरांच्या गंभीर दुर्लक्षामुळे घडले आहे.
यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात याच रुग्णालयात सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हणजेच ही एक अकस्मात घटना नसून, सातत्याने चालत असलेली निष्काळजीपणाची व जबाबदारी टाळण्याची प्रणाली आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालय हे संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी आशेचे केंद्र असायला हवे होते;
परंतु प्रत्यक्षात ते मृत्यूकेंद्र बनले आहे.
येथील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी हे केवळ हजेरी लावणारे कर्मचारी बनले आहेत.
ना त्यांना रुग्णसेवेची भावना आहे, ना जबाबदारीची जाणीव.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी मिळतो;
तरीही रुग्णालयात प्राणवायू, आपत्कालीन ॲम्बुलन्स, रक्त उपलब्धता व प्रसूती सुविधा यांचा पुरवठा खंडित स्थितीत आहे.
ही परिस्थिती केवळ दुःखद नाही तर फौजदारी गुन्ह्याच्या चौकशीस पात्र आहे.
कारण एका निरपराध तरुण मातेला तिच्या मूलाला जन्म देताना जिवंत ठेवण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे.
आमदार विलास तरे यांनी मागणी केली की —
- प्रिती जाधव यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी तातडीने आदेशित करण्यात यावी.
- कर्तव्यावर असलेले डॉक्टर मनाली कोकाटे, डॉक्टर प्रशांत राजगुरू व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
- मनोर ग्रामीण रुग्णालयातील १०८ ॲम्बुलन्स सेवा व ऑक्सिजन पुरवठा प्रणालीची सखोल चौकशी करण्यात यावी.
- मृत प्रिती जाधव यांच्या कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
- पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या कार्यपद्धतीची विशेष तपासणी मोहीम तात्काळ राबवावी.
आमदार तरे म्हणाले, “ही घटना केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नाही, तर संपूर्ण ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या अपयशाची साक्ष आहे. दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.”
📌 यावेळी आमदार विलास तरे यांनी मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी देखील मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कडे केली आहे.
✍️ मनोर प्रतिनिधी : सोहेल खतीब.



