पालघर | मनोर हद्दीत धक्कादायक प्रकार – ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला

पालघर | मनोर हद्दीत धक्कादायक प्रकार – ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला

पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या जय अंबे ढाबा येथे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालकावर ढाबा मालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक चालक जेवणासाठी ढाब्यावर थांबला असताना काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर जय अंबे ढाब्याचा मालक व त्याचे कर्मचारी यांनी चालकाला निर्दयीपणे मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने त्याच्यावर पेट्रोल/रॉकेल ओतण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांखाली कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जय अंबे ढाब्यावर यापूर्वीही चोरीचा डिझेल, लोखंड, केमिकल आदी बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या होत्या. तसेच, ढाबा मालक पोलिसांनाही न जुमानता खुलेआम गुंडगिरी करत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, एवढ्या गंभीर गुन्ह्यांनंतरही संबंधित ढाब्यावर कारवाई का झाली नाही? तसेच, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पीडित ट्रक चालकाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *